पुण्यात डोळ्यांची साथ, पालिकेला नाही खबरबात
इंदू भगत
पुणे शहराच्या मध्य भागात डोळे येण्याची साथ आली आहे. घोरपडे पेठ परिसरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या २५ मुलींना संसर्ग झाला आहे. मात्र, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग यापासून अनभिज्ञ असून कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. घोरपडे पेठ परिसरातील सेंट हिल्डाज गर्ल्स हायस्कूलमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या २५ हून अधिक मुलींना सोमवारी संसर्ग झाल्याचे आढळून आले. या वसतिगृहात १५० मुली राहतात.
शाळेचे संचालक आशिष जेम्स यांनी ‘पुणे मिरर’ शी बोलताना सांगितले की, सुमारे ३० मुलींना संसर्ग झाल्याने वेगळे ठेवण्यात आले आहे. पाच मुली बऱ्या झाल्या आहेत. सुरुवातीला जेव्हा काही मुलींनी डोळ्यांची आग होत असल्याची तक्रार केली तेव्हा आम्हाला वाटले की पावसाळ्यामुळे असेल. आम्ही त्यांना घरी जाण्यास सांगितले. परंतु संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर मुलींना शाळेच्या इमारतीजवळील पीएमसी संचालित सावित्रीबाई फुले रुग्णालयात पाठवले. खबरदारीचा उपाय म्हणून संसर्ग झालेल्या मुलींना वेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे .
पुण्यालगत आळंदीमध्ये ७५०० हून अधिक जणांना डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, त्याची दखल पुणे महापालिकेने घेतली नाही. त्यामुळे एका शाळेतील प्रकार समोर येऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केलेली नाही.
पुणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, “पुण्यातील डोळ्याच्या साथीबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. पावसाळ्यात डोळे येणे ही सामान्य गोष्ट आहे. संक्रमित व्यक्तींनी आयसोलेशन प्रोटोकॉलचे पालन करावे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.