जिलेटिनची कांडी जोडल्याने मोबाईलचा स्फोट
नितीन गांगर्डे
मोबाईलच्या बॅटरीला जोडलेल्या िजलेिटनच्या कांडीचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी या गावात बुधवारी (३१ मे) हा प्रकार घडला आहे. साहिल नाना मस्के असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर हडपसर येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असून दोन टाके पडल्याचे साहिलची आई लक्ष्मी मस्के यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावामधील नाना मस्के आणि त्यांची पत्नी लक्ष्मी मस्के हे शेतात मजुरीचे काम करतात. बुधवारी मस्के दाम्पत्य नेहमीप्रमाणेच कामावर गेले होते. ते कामावर गेले असताना साहिल घरी एकटाच होता. घरात खेळत असताना छोट्या मोबाईलची एक बॅटरी त्याला सापडली. तो त्या बॅटरीसोबत खेळू लागला. मस्के यांच्या घराच्या मागे मोकळे मैदान आहे. त्या ठिकाणी ट्रॅक्टर लावलेले असतात. त्या ट्रॅक्टरमधून विहिरीच्या कामावरील शिल्लक खडक वाहिला जातो. घरामागील मैदानामध्ये असलेल्या ट्रॅक्टरच्या तिथे साहिलला खेळत असताना एक जिलेटिनची कांडी पडलेली दिसली. विहीर पाडताना स्फोट घडवून आणण्यासाठी या कांड्यांचा वापर केला जातो.
साहिलने ती जिलेटिन कांडी उचलली आणि मोबाईलच्या बॅटरीला जोडली. त्यावेळी तिचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
या झालेल्या स्फोटामध्ये साहिलच्या पायाला आणि डोळ्याला तसेच मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. स्फोट झाल्यावर साहिल प्रचंड घाबरला होता. काही वेळ त्याला काहीच सुचत नव्हते. शेजारच्या घरातील नागरिकांना कोणीतरी मोठा फटाका वाजवला असेल असा समज झाला. साहिलची आई जवळच असलेल्या शेतात काम करत असल्याने त्यांनी हा आवाज ऐकला आणि काय झाले आहे हे पाहायला त्या घरी धावल्या. त्यावेळी साहिल जखमी झाला होता. सुरुवातीला त्याला जवळच्या दौंड येथील दराडे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. साहिलचे रक्त साकाळले असून डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे.
साहिलचे वडील नाना मस्के हे तीन वर्षांपूर्वी उस्मानाबाद येथून पिंपळसुटी गावामध्ये रोजंदारीसाठी आले होते. या ठिकाणी ते पंढरीनाथ खंडाळे यांच्या शेतात मजुरीचे काम करत असल्याची माहिती पिंपळसुटी गावाचे सरपंच नितीन फलके यांनी दिली. त्यांचा मुलगा साहिल मस्के हा दहा वर्षांचा आहे.
गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये तो दुसरीच्या वर्गात शिकत आहे. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे तो घरीच असतो. तर त्याचे आई-वडील हे कामावर असतात. घरी मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळत असताना स्फोट झाला आणि त्यात साहिल जखमी झाला. अपघात झाल्यावर मी मस्के कुटुंबीयांना भेटलो. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तत्काळ जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार आणि आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क करून त्यांच्या मदतीने साहिलसाठी रुग्णालयात येणाऱ्या खर्चाची व्यवस्था केल्याचेही फलके म्हणाले.
दरम्यान १ जून रोजी साहिलला हडपसर येथील देसाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यावरील पट्टी लवकरच काढणार असल्याचे आणि प्रकृती बरी असल्याचे साहिलने 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.