ऊर्जा विभाग, सरळ सेवा भरती परीक्षा रखडल्या, स्पार्धा परीक्षा विद्यार्थ्यांत आले नैराश्य

सरळसेवा भरतीच्या ७५ हजार जागा, ऊर्जा विभागातील सहायक आणि कनिष्ठ अभियंता पदासह विविध प्रकारची ३६ हजार पदे रिक्त आहेत. ही भरती प्रक्रिया रखडली असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:24 am
ऊर्जा विभाग, सरळ सेवा भरती परीक्षा रखडल्या, स्पार्धा परीक्षा विद्यार्थ्यांत आले नैराश्य

ऊर्जा विभाग, सरळ सेवा भरती परीक्षा रखडल्या, स्पार्धा परीक्षा विद्यार्थ्यांत आले नैराश्य

ऊर्जा, सरळ सेवा भरती परीक्षा रखडल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींना घेरले नैराश्याने

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

सरळसेवा भरतीच्या ७५ हजार जागा, ऊर्जा विभागातील सहायक आणि कनिष्ठ अभियंता पदासह विविध प्रकारची ३६ हजार पदे रिक्त आहेत. ही  भरती प्रक्रिया रखडली असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी गेली चार ते सात वर्षे वाट पाहिल्यानंतरही भरती प्रक्रिया सुरूच झाली नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची संधी वय उलटल्याने वाया जाणार आहे.

राज्य सरकारने ७५ हजार जागा सरळसेवा भरतीद्वारे भरण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, पोलीस भरतीच्या १८ हजार जागा वगळता इतर भरती प्रक्रिया खोळंबली आहे. पोलीस भरतीच्या मुंबईतील जागांची भरती प्रक्रिया रखडली आहे. इतर सर्वच विभागांची भरती प्रक्रिया रखडली आहे. आरोग्य आणि वनसेवेसाठी भरती प्रक्रिया राबवली. मात्र त्यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्याने ही प्रक्रिया खंडित झाली आहे. त्यामुळे  उमेदवारांची कोंडी झाली आहे.  ऊर्जा विभागाने पाळले नाही लेखी आश्वासनही...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वच विभागात पदभरती करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर २०२२ रोजी उपसचिव सुरेश रेडेकर यांनी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना ३१ मार्च २०२३ पर्यंत भरती प्रक्रिया राबवण्याची सूचना केली होती. पाठोपाठ राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी २२ डिसेंबर २०२२ रोजी महावितरणमध्ये ३६ हजार पदे भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी झाली नाही. फेब्रुवारी २३ अखेरीस महावितरणमध्ये सहायक अभियंतापदाच्या ५५९ आणि कनिष्ठ अभियंतापदाच्या ३९१ जागा प्रलंबित असल्याचे त्यांनी माहिती अधिकारात सांगितले. सहायक अभियंतापदाची शेवटची भरती २०१६ आणि कनिष्ठ अभियंतापदाची भरती २०१९ रोजी झाली होती. या पदभरतीला अनुक्रमे पाच ते सात वर्षे उलटूनही भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकर राबवावी अशी मागणी विद्युत अभियंता संघटनेच्या आंदोलनाचे समन्वयक भूषण सोनावणे यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांच्याकडे केली. शुक्ला यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पदभरतीची जाहिरात काढण्याच्या तोंडी सूचना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी प्रसाद तांबे म्हणाला, ऑक्टोबर २०२२ मध्ये सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, विक्रीकर अधिकारी अशा विविध पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा झाली. मात्र, अजून त्याचा निकाल लागला नाही. राज्यातील हजारो जागा रिक्त असताना भरती प्रक्रिया वेळेत राबवली जात नाही. परीक्षा झाल्यास त्याचा निकाल वेळेत लागत नाही. आता माझे वय ३१ असल्याने घरच्यांकडूनही स्पर्धा परीक्षेला पर्याय शोधण्यासाठी दबाव यायला लागला आहे. त्यांना माझ्या लग्नाची चिंता लागली आहे.

गेली पाच ते सात वर्षे ऊर्जा विभागातील पदभरती रखडली आहे. महावितरणमध्ये पदभरतीसाठी ३० वर्षांची वयोमर्यादा आहे. साधारण २१-२२ व्या वर्षी अभियंत्याची पदवी हाती येते. त्यानंतर पाच-सात वर्षे परीक्षाच होत नसेल तर एका पिढीची संधीच वाया जाईल. दरवर्षी ठराविक जागा भरल्या जातील, असे नियोजन करायला हवे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. मात्र, असे काही नियोजनच नसल्याने परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी निराश झाले आहेत. अनेकांचे वय उलटून गेले आहे. माझे वय २६ वर्षे असून, मी गेली चार वर्षे परीक्षेची तयारी करीत आहे. माझ्याप्रमाणेच विद्युत अभियंता असलेले २० ते २५ हजार विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करावे.

- भूषण सोनवणे, विद्युत अभियंता संघटना     

जिल्हा परिषद, नगरपरिषद, तलाठी, पुरवठा निरीक्षक, वन भरती आरोग्य भरतीची परीक्षा प्रलंबित आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात आली. मात्र, अजून परीक्षा नाही. शिक्षक भरतीची नुसतीच घोषणा करण्यात आली आहे. सरळसेवा भरतीतील ७५ हजार जागांपैकी फार थोड्या जागा भरल्या आहेत. कृषी-पशु संवर्धन विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, परीक्षेच्या तारखाच जाहीर केल्या नाहीत. सरकारी उदासिनतेमुळे भरती प्रक्रियेची नुसतीच घोषणा झाली. वेगाने निर्णय काही होईना. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढत असून, संधी कमी होत आहेत.  

- महेश घरबुडे, 

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

 मी मूळचा लातूरचा असून गेल्या चार वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. हजारो जागा रिक्त असताना सरकार केवळ भरतीच्या घोषणा करते मात्र त्याचे सुयोग्य नियोजन करीत नाही. एखादी भरती झाल्यास त्यात आरोग्य अथवा वन भरतीसारखा घोटाळा होतो. मग, ती प्रक्रिया देखील खोळंबते. एखादी परीक्षा विनासायास पार पडली. तर, त्याचा निकाल वेळेत लागत नाही. माझे वय २८ झाले आहे. किती काळ आंधळेपणाने परीक्षेची तयारी करत राहायचे?

- शुभम तिडके, 

स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story