ईडीची छापेमारी सुरू असतानाच पुरावे नष्ट

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन ॲड. अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा मारल्यानंतर मूलचंदानी याने नऊ तास घरातच लपून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मूलचंदानी, त्याचा भाऊ व माजी सहायक सरकारी वकील अशोक साधुराम मूलचंदानी याच्यासह कुटुंबावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर मूलचंदानी

अमर मूलचंदानीसह कुटुंबावर गुन्हा दाखल

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन ॲड. अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा मारल्यानंतर मूलचंदानी याने नऊ तास घरातच लपून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी मूलचंदानी, त्याचा भाऊ व माजी सहायक सरकारी वकील अशोक साधुराम मूलचंदानी याच्यासह कुटुंबावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. मूलचंदानी बंधूंसह मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी आदींवर पुरावा नष्ट करणे, कट रचणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवा विकास बँकेतील कथित गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात १६ विविध गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सेवा विकास बँकेचा परवाना देखील रद्द केला आहे. या विविध गुन्ह्यांतून जामिनावर सुटल्यानंतर अमर मूलचंदानी हा अधून मधून त्याच्या पिंपरी कॅम्पमधील घरी येऊन जात होता. दरम्यान, सेवा विकास बँक प्रकरणात ईडीने शुक्रवारी (२७ जानेवारी) सकाळी साडेसहा वाजता मूलचंदानी याच्यासह सागर सूर्यवंशी तसेच पुण्यातील एका खासगी शाळेच्या संस्थापक अध्यक्षाच्या घरावर छापा मारला. यावेळी मूलचंदानी याच्या घरच्यांनी आतून बंद असलेले दार सुमारे दीड-दोन तास उघडले नव्हते.

ईडीने यावेळी सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी बरोबर घेतले होते. बराच वेळ दार वाजवूनदेखील मूलचंदानी दार उघडत नसल्याने ईडीने किल्ली बनविणाऱ्या व्यक्तीला आणल्यावर मूलचंदानीने आतून दार उघडले होते. मूलचंदानी राहात असलेल्या मिस्टी पॅलेस या इमारतीत ठिकठिकाणी आणि अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच  मूलचंदानी याच्या घराबाहेर (फ्लॅट एक संपूर्ण मजला) सीसीटीव्ही आहेत. ईडीने छापा मारल्यावर संपूर्ण इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. मूलचंदानी याच्या घरात प्रवेश केल्यावर तेथे अमर मूलचंदानी सोडून अन्य कुटुंब उपस्थित असल्याचे भासविण्यात आले होते. तसेच हे कुटुंब ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करताना खोटी आणि विसंगत माहिती सांगत होते. घरात तपासणी करताना बंद खोल्या उघडण्यावरून कुटुंबीय ईडी अधिकाऱ्यांना मज्जाव करीत होते. ईडी अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केल्यावर सुमारे साडेआठ तास अमर मूलचंदानी हा वरील मजल्याच्या खोलीत लपून त्याने अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच काही मोबाईल सीम कार्डदेखील त्याने गायब केल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दुपारी साडेतीनच्या सुमारास अमर मूलचंदानी लपलेल्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांनी किल्ली बनविणारा आणून ते दार उघडत मूलचंदानी  याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तीन तासांनी अमर मूलचंदानी याने छातीत दुखत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी एका खासगी डॉक्टरला घरी बोलाविले. पण ईडी अधिकाऱ्यांनी अमर मूलचंदानी याच्या तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून दोन डॉक्टरांना बोलावले मूलचंदानी याच्या तीन आलिशान कार, अनेक कागदपत्र ईडीने जप्त केली आहेत. या दोन्ही सरकारी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर रात्री उशिरा अमर मूलचंदानी याला पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ईडी अधिकाऱ्यांनी एकाच वेळेस सेवा विकास बँक प्रकरणात तीन ठिकाणी छापे मारले होते. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ईडी अधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये तळ ठोकून होते. निरीक्षक रुपाली बोबडे तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story