Ebola attack : अबोल्याने केला घात; पोलिसांनी मग टाकले आत

ओळखीच्या तरुणीने बोलणे बंद केले म्हणून तिला चारचाकीतून जबरदस्तीने दूर नेऊन तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि अन्य काही कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला तत्काळ अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 25 Jul 2023
  • 02:29 am
अबोल्याने केला घात; पोलिसांनी मग टाकले आत

अबोल्याने केला घात; पोलिसांनी मग टाकले आत

हडपसर पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीची तक्रार दाखल; आरोपीस तत्काळ अटक, पोलीस कोठडीत रवानगी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

ओळखीच्या तरुणीने बोलणे बंद केले म्हणून तिला चारचाकीतून जबरदस्तीने दूर नेऊन तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, विनयभंग आणि अन्य काही कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला तत्काळ अटक केली आहे.  

आजीम आयुब मुलाणी (वय २२ वर्षे, रा. वडकी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते ११ च्या दरम्यान त्याने तरुणीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हडपसर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले की, आरोपी आजीम ऊर्फ अज्जू आयुब मुलाणी हा वडकी येथील रहिवासी आहे. त्याच्या घराजवळ फिर्यादी तरुणी राहते. दोघे शेजारी-शेजारी राहात असल्यामुळे त्यांची ओळख होती. आरोपी आणि पीडित तरुणी या दोघांत बोलणे होत होते. मात्र, फिर्यादीच्या घरच्यांना फिर्यादीने आरोपीशी बोललेले आवडत नव्हते. घरच्यांची नापसंती असल्याने त्यांना नाराज न करण्यासाठी तरुणीने आरोपी मुलाणीशी बोलणे बंद केले. 

बोलणे बंद केल्याचा राग मुलाणीला आला आणि तो तरुणीवर चिडला. रागाच्या भरात तो तिला वारंवार फोन करत होता. मात्र, ती कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्याने रागाच्या भरात पीडितेच्या आई व भावाला मिस कॉल देण्यास सुरुवात केली. यासाठी तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करत होता. तो फिर्यादीच्या आईला आणि भावाला फोनवरून शिवीगाळ व दमदाटी करत होता. याच काळात त्याने पीडितेच्या घरच्यांना बघून घेईन, अशी धमकीही दिली. राग डोक्यात ठेवूनच त्याने पीडितेचा खून करण्याचे ठरवले. 

मुलाणीने शनिवारी (२२ जुलै) सकाळी साडेदहा ते ११ च्या दरम्यान हडपसर येथील रविदर्शन चौकातील अतिथी हॉटेलसमोर पीडित तरुणीला अडवले. त्या वेळी ती तिच्या मामेभावासोबत मोटारसायकलवरून जात होती. आजीम हा कारमधून तेथे आला होता. त्याने तिचा हात पकडला व मामेभावाचा हात धरून त्यालाही शिवीगाळ केली. तरुणीच्या हाताला झटका देऊन त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले व अमनोरा मॉल येथे नेले. तेथे तिला शिवीगाळ करून ठार मारण्याच्या उद्देशाने हाताने जोरात गळा दाबला व मी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली. या प्रकरणी फिर्यादी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, घटनास्थळी साहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी भेट दिली असून, हडपसर पोलिसांनी आरोपीस ताबडतोब अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story