डंपर अन् बेशिस्तीने केला नगर रस्त्याचा घात
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
बेशिस्त वाहतूक, डंपरमधून सँडक्रश आणि इतर साहित्यांची धोकादायक पद्धतीने केली जाणारी वाहतूक, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन दामटणे, अडथळा ठरत असलेले बसस्टॉप, चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर थांबणाऱ्या बस आणि रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे पुणे-नगर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे.
पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांमुळे वारंवार चर्चेत असतो. लोणीकंद पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद लक्षणीय आहे. या रस्त्याची क्षमता ५० हजार कार युनिट्सची आहे. मात्र, सध्या ७५ हजार वाहने इथे दररोज धावतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त वाहतूक होते. त्यातच अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पीडब्ल्यूडी आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी या रस्त्याची संयुक्त पाहणी केली. संबंधित विभागांना हे अडथळे दूर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. आरटीओ आणि पीडब्ल्यूडी आपल्या स्तरावरील कामे वेगाने करणार आहेत.
रांजणगाव एमआयडीसी ते खराडी दरम्यानच्या रस्त्याच्या स्थितीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांच्या पथकाने संयुक्त सर्वेक्षण केले. सार्वजनिक बांधकाम विभागालाही रस्त्यावरील नेमक्या अडचणी कोणत्या आहेत, याचा अंदाज यावा यासाठी संयुक्त पथकाद्वारे ही तपासणी करण्यात आली. पीडब्ल्यूडी आणि महापालिका हद्दीपुढील रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रांजणगाव एमआयडीसी येथे बसमुळे अडथळा होतो. रस्त्यालगत बस स्थानक असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे येथील स्थानक रस्त्यापासून काही अंतरावर नेण्याची सूचना केली जाणार आहे. शिवाय रांजणगाव येथील अतिक्रमणे काढण्याची सूचनाही केली जाणार आहे. त्याचबरोबर नगर-पुणे मार्गावर सर्व्हिस रस्ताच नाही. त्यामुळे लगतच्या गावातील वाहनांना जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही. अनेक ठिकाणी घराच्या समोरून रस्ता जातो. अचानक एखादे वाहन रस्त्यावर आल्यास अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा गावात लोखंडी रेलिंग लावण्याची सूचना केली जाणार आहे.
रांजणगाव येथील मझाक कंपनीजवळ एल अँड टी चौक आहे. येथे स्पीड ब्रेकर आणि ब्लिंकर बसवण्यात येतील. वाहतुकीच्या तुलनेत रस्ता अपुरा पडतोय. त्यातच बेशिस्त पादचारी आणि वाहनचालकांमुळे येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. वाघोलीतील बीजेएस चौकात बसथांब्याजवळ वाहने थांबवली जात नाहीत. रस्त्यावर बस थांबल्याने त्याचा वाहतुकीला अडथळा होतो. वाघोलीत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन दामटण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय क्रश सँडची वाहतूक खुल्या पद्धतीने केली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई म्हणाले, ‘‘वाघोलीतून दररोज १ लाख १० हजार वाहने पुढे जातात. यातील ६० टक्के वाहने तीन चाकी आणि दुचाकी असून, चारचाकी वाहनांची संख्या ४० हजारांवर आहे. लोणीकंद आणि शिक्रापूरमधून पुढे जाणाऱ्या वाहनांची संख्या ५० ते ६० हजार आहे. या रस्त्याची मुख्य अडचण म्हणजे रस्त्याच्या तुलनेत वाहनांची असलेली प्रचंड संख्या ही आहे.’’
‘‘वाघोलीत डिव्हायडर तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात अनेक जिवघेणे अपघात झाले आहेत. या मार्गावरील अशा १६ वाटा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाघोली आणि शिक्रापूरमधील अतिक्रमणे तोडावी लागतील. शिक्रापूर येथील रस्ता ८ लेनचा करावा लागेल. वाघोलीत सकाळच्या वेळी वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे इथे स्पीडगन बसवावी, अशी सूचना आरटीओला केली आहे. त्याचबरोबर वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे, ’’ असेही बारभाई यांनी सांगितले.