'डॉली की डोली' वाली टोळी अटकेत

लग्न जमण्यास अडचण येणाऱ्या मुलांना हेरून त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळून परागंदा होणारी एक तथाकथित वधू आणि तिच्या पाच साथीदारांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. 'डॉली की डोली' चित्रपटासारख्या 'फिल्मी स्टाईल'ने ही तथाकथित वधू खोटा विवाह करत मुलाच्या घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:35 am
'डॉली की डोली' वाली टोळी अटकेत

'डॉली की डोली' वाली टोळी अटकेत

लग्न न जमणाऱ्या मुलांना हेरून लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या बनावट वधूसह सहा जणांना अटक; नारायणगाव परिसरातील २० ते २२ मुलांशी बनावट लग्न करून दागदागिने रोख रक्कम लुटली

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

लग्न जमण्यास अडचण येणाऱ्या मुलांना हेरून त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळून परागंदा होणारी एक तथाकथित वधू आणि तिच्या पाच साथीदारांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. 'डॉली की डोली' चित्रपटासारख्या 'फिल्मी स्टाईल'ने ही तथाकथित वधू खोटा विवाह करत मुलाच्या घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत होती. फसवणूक करणारी ही सराईत टोळी असून, त्यांनी २० ते २२ मुलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.  

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी आणि खोडदच्या शेतकरी कुटुंबातल्या दोन तरुणांची संबंधित वधूने लग्न करून फसवणूक केली आहे. तिने दागिने आणि रोख रक्कम मिळून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या एका वराने तक्रार दाखल केली होती. या टोळीतील बनावट नवरीसह तिच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

मुलींची संख्या कमी असल्याने अनेक मुलांना लग्नासाठी वधू मिळणे कठीण जात आहे. ९० च्या दशकात गर्भलिंग चाचणीचा शोध लागल्याने स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर झाल्या. त्यामुळे या काळात जन्मलेल्या मुलांसाठी मुलींची संख्या कमी असल्याने अनेकांना लग्नासाठी अडचण येत आहे. अनेक मुलांच्या वयाची तिशी उलटून गेली, तरी अद्याप लग्न झालेले नाही. त्यातही ग्रामीण भागात ही अडचण प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर लग्नाचे वय निघून जात असल्याने फारसा विचार न करता पैसे देऊनही लग्न करण्याची अनेकांची तयारी असते. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एक टोळी लग्न न जमणाऱ्या मुलांचा शोध घेत होती. त्यांना हेरून या टोळीतील एजंट मध्यस्थी म्हणून मुलाच्या घरी जाऊन आमच्या पाहण्यातील एक मुलगी आहे. तिला वडील नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मुलीची आई सतत आजारी असते. तिला उपचारासाठी पैशांची गरच आहे. तुम्हाला पैसे द्यावे लागतील. मुलगी पसंत पडली की, अर्धे पैसे द्यायचे आणि लग्न झाल्यावर बाकी शिल्लक द्यायचे अशी बोली करत असे.

पारंपरिक पद्धतीचे आणि रीती-रिवाजाचे पालन करून लग्न जमवले जात असे. ते जमवताना वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. मुलांची आर्थिक परिस्थिती पाहून पैशांची मागणी कमी-अधिक करत 'डील' पक्की केली जात असे. त्यासाठी तीन जण एजंट म्हणून काम पाहात होते. ते लग्न न जमणाऱ्या मुलांना शोधून त्यांचा मुलींशी संपर्क करून देत.  लग्नाचा सगळा खर्च मुलाला करायला लावून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावले जाई. त्याचा सगळा खर्च मुलालाच करावा लागत असे. लग्न झाल्यावर मुलाकडून राहिलेले अर्धे पैसे घेतले जायचे. लग्नाची नोंदणी न करताच दोन ते चार दिवस मुलाच्या घरी राहून तथाकथित वधू धार्मिक विधीसाठी माहेरी जात आहे, असे सांगून फरारी होत होती. त्या वेळी ती तिच्यासोबत सोन्याचे दागिनेही घेऊन जात होती.  

या प्रकरणी ज्या मुलासोबत लग्न केले आहे त्याने मुलगी परत कधी येणार, असे मध्यस्थाला  विचारल्यावर त्याला या टोळीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असे किंवा मुलगी पळून गेली असल्याचे सांगितले जाई. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलगा शांत राहात होता. समाजात आपला मान कमी होईल. आपली खिल्ली उडवली जाऊन आपण लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ, या भीतीपोटी फसवणूक झालेला मुलगा शांत राहिल्याने या टोळीचा आत्मविश्वास वाढत असे आणि ते पुढील सावज शोधून त्याच पद्धतीने फसवणूक करत असत.    

या प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणाची  १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर त्याने  नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार केली होती. त्यांचे काही दिवसांपूर्वीच जुन्नरमधील शिवपार्वती विवाहसोहळा केंद्रात वैदिक पद्धतीने लग्न लावण्यात आले होते. लग्नाला मुलगी, तिची आई आणि इतर पाच-सहा मंडळी मुलीच्या बाजूने उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर ते जुन्नर येथील न्यायालयामध्ये विवाह नोंदणी करण्यासाठी गेले. त्यावेळी विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्र नसल्याने नोंदणी होऊ शकली नव्हती. त्यानंतर तेथील एका वकिलाकडून या बाबतीत नोटरी करून घेण्यात आली होती आणि मुलाकडून पैसे उकळले गेले. दोन दिवसांनी माहेरी जाते असे सांगून मुलगी फरार झाली. त्यानंतर तथाकथित वधू पळून गेल्याचे मुलाला सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेऊन या संपूर्ण टोळीला अटक केली आहे.

या प्रकरणी बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी, शिरजगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), बनावट मावशी आणि टोळीची प्रमुख मीरा बन्सी विसलकर (वय ३९) आणि तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा अंबुजा वाडी, इगतपुरी घोटी, जिल्हा नाशिक), तर एजंट बाळू भिकाजी काळे (वय ४६, रा.बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर), शिवाजी शंकर कुरकुटे( वय ६४, रा कुरकुटेवाडी, बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा नगर), बाळू गुलाब सरवदे (वय ४१, राहणार गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) या आरोपींना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता अटक केली आहे.

ज्या तरुणांना काही कारणास्तव विवाहासाठी वधू मिळत नाही अशा तरुणांना हेरून या टोळीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेतली. मात्र, लग्नानंतर दोनच दिवसांत तथाकथित वधूने पोबारा केला. नारायणगाव परिसरातील अशा २२ मुलांची फसवणूक झाल्याचे समजते. परंतु, समाजात चेष्टेचा विषय आणि मानहानी होऊ नये म्हणून फसवणूक झालेले नागरिक शांत बसतात. त्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाऊन आरोपींना अटक केली जाईल. 

- विनोद धुर्वे, पोलीस उपनिरीक्षक, नारायणगाव पोलीस ठाणे  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story