आरटीओत डिजिटल दलाल

डिजिटल, ऑनलाईन, फेसलेस सेवा असे कितीही दावे केले, तरी आरटीओ कार्यालयास विळखा आहे तो दलालांचा! कागदपत्रांशिवाय वाहनांबाबतचे कोणतेही काम करून देण्याचे आमिष दलाल दाखवतात आणि मग सुरू होते नागरिकांची ससेहोलपट..

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Tue, 11 Jul 2023
  • 11:30 am
आरटीओत डिजिटल दलाल

आरटीओत डिजिटल दलाल

नितीन गांगर्डे / महेंद्र कोल्हे

nitin.gangarde/mahendra.kolhe@civicmirror.in

डिजिटल इंडिया, ई सेवा, ऑनलाईन व्यवहार, पारदर्शी कारभार, मध्यस्थाशिवाय काम हे  सगळे शब्द पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस- आरटीओ) पुरातत्त्व  विभागाने तिजोरीत बंद करून ठेवले आहे की काय अशी शंका येथे गेल्यावर आपल्या मनात येते. आरटीओत गाडी चालवण्याचा परवाना काढण्यासाठी गेल्यावर एजंट वर्गाचा मोठा सुळसुळाट असल्याचे पाहावयास मिळते. आवश्यक कागदपत्रे असो किंवा नसो, कागदपत्रे पूर्ण असो की अपूर्ण तरीही तुम्हाला काही अडचण येणार नाही. तत्काळ परवाना काढून दिल्याचा विश्वास एजंट आपणाला देतात असे ‘सीविक मिरर’ च्या आळंदी आरटीओ कार्यालयाच्या  पाहणीत आढळून आले आहे. झझ नुकतीच या कार्यालयाला भेट दिली असता दुचाकीवरून उतरण्यापूर्वी दोन एजंट धावत जवळ आले. काय करायचे आहे? परवाना काढण्यासाठी तुमची चाचणी आहे का? मी तुम्हाला सगळी मदत करतो, असे म्हणत ते अक्षरशः मागेच लागत असल्याचे संबंधित प्रतिनिधीला आढळले. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यावर लगेच एजंट गराडा घालतात. अत्यंत आपुलकीने तुमच्या कामाची विचारपूस करतात. तेथून निघेपर्यंत पाठ सोडत नाहीत. आम्ही सगळी कामे करून देतो. त्यासाठी तुम्हाला फक्त ५०० रुपये द्यावे लागतील. वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठीची चाचणी असते ती आमच्यातर्फे दिली तर येथील निरीक्षक, अधिकारी लगेचच पास करतात. तुमच्या त्रुटींकडे, चुकांकडे दुर्लक्ष करतात. चाचणीच्या वेळी इंग्रजी आठ अक्षराचे एक वर्तुळ असते. ते वाहन चालवत पूर्ण करायचे असते. त्यासाठी जमिनीवर खाली पाय न टेकवताच ते वर्तुळ पूर्ण करणे अपेक्षित असते. यावेळी दुचाकीचे इंडिकेटर सुरू करावे लागते. ही चाचणी देताना तुम्ही जर थेट मध्यस्थांशिवाय गेलात तर अधिकारी तुमच्या बारीक सारीक चुका काढतात आणि नंतर डोक्याला ताप होतो. साहजिकच वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यास अडचण येते. नाना प्रकारच्या गोष्टी, कारणे सांगून एजंट अक्षरशः हैराण करतात. त्यांच्याशी बोलणेही चूक ठरते. काही करून ते तुमच्या मागावर राहतात. अशात एक एजंट तेथून दूर गेला की दुसरा लगेच हजर होतो.

येथे अधिक संख्या  एजंटांची असलेली पाहावयास मिळते. त्यांच्याकडे आपण स्वतःहून गेलो नाही तरी ते स्वतःहून आपल्याकडे विचापूस करण्यासाठी येतात. एकदा का त्याच्याशी थोडे जरी बोलले तरी तुमचा ते पाठलाग सोडत नाहीत. त्यांना काम दिल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे आपल्याला वाटते. 

एखाद्याची इच्छा नसली तरीही तुमच्याकडे ५०० ते ६०० रुपये द्या अशी मागणी करतात. लवकर होकार द्यावा यासाठी आता जेवणाची सुट्टी होणार आहे. त्यानंतर तुमचा नंबर येण्यासाठी खूप वेळ लागेल, नंतर अनेक वाहने चाचणीसाठी येतात त्या गर्दीत तुमचा नंबर लागणार नाही. कारण त्यांनी आधीच नंबर लावलेला असतो, अशी विविध कारणे ते सांगतात. त्याच्यावर विश्वास बसावा यासाठी लांबूनच अधिकाऱ्यांना मोठ्याने आवाज देऊन एक चाचणी आहे थोडा वेळ थांबणार ना, अशी विचारणा करतात. अधिकारीही तिकडून मान हलवून होकार देतात. असाच एक प्रकार घडल्याचे या प्रतिनिधीला आढळले. एका एजंटने विश्वास पटण्यासाठी एका महिला अधिकाऱ्याला मोठ्याने आवाज दिला, मॅडम एक चाचणी घ्यायची, थोडा वेळ आहे ना, यावर तिकडून त्या महिला अधिकाऱ्यांनी होकारार्थी मान हलवली. या सगळ्यावरून येथील अधिकारी आणि एजंट यांच्यात काही साटेलोटे, आर्थिक व्यवहाराचे देणे-घेणे आहे का हे समजण्यास मार्ग नव्हता. मात्र येथील अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच एजंट बिनधास्त वावरत असतात एवढे नक्की.  

चाचणी देण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यक असते. ते कोणते आहेत याची एक यादी कार्यालयाच्या बाहेर लावलेली आहे. त्यातील कोणतीच कागदपत्रे आमच्याकडे आता नाहीत असे सांगितल्यावरही एजंट ‘काळजी करू नका तुम्हाला मी सगळे करून देतो. चाचणीसाठीचा भरलेला फॉर्म द्या अशी मागणी करतात. यावर तोही नाही असे सांगितल्यावर तेच लगेच तुम्हाला फॉर्म देतात. तुमचा ऑनलाईन रजिस्टर नंबर सांगा,  तुमचे आधार कार्ड द्या, ते नसेल तर फोटो मागवून घ्या असे सांगितले जाते. कार्यालयाच्या आवारातच एका ओम्नी गाडीत प्रिंटरची व्यवस्था करण्यात आलेली  आहे. त्या ठिकाणी एजंट स्वतः घेऊन जातात. लगेच फॉर्म मागतात, तुमच्याकडील असलेल्या आधारकार्डची प्रिंट काढतो, असे सांगतात. या प्रतिनिधीने कशीबशी तेथून सुटका करून घेतली.

चाचणीसाठी आलेल्या एका नागरिकाने सांगितले की, " एजंट माझ्या मागे खूप लागला. माझी येथे येण्याची पहिलीच वेळ असल्याने माझा गोंधळ उडाला होता. थोडीशी भीतीही वाटली. आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना मिळावा यासाठी मी त्यांना होकार दिला. नंतर ते कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मला घेऊन गेले. त्यावेळी मी जाऊ नये म्हणून माझी ओरिजनल कागदपत्रे त्यांनी स्वतःकडे ठेवली होती".  

एकूणच परवाना काढण्यासाठीची सगळी प्रक्रिया ऑनलाईन असते. ती सगळी पूर्ण झाल्यावर चाचणी होते. त्यासाठीची फी ही ऑनलाईन भरली जाते मात्र येथे असलेले एजंट चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासच देत असल्याचे या प्रतिनिधीला आढळून आले. येथील कार्यालयात एवढ्या मोठ्या संख्येने एजंट असतातच का, असा सवाल नागरिकांना पडत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story