धोकादायक पादचारी पुलाला नवा मुलामा

पुणे रेल्वे स्थानकातील ८० वर्षांहून अधिक जुन्या धोकादायक पादचारी पुलावर रेल्वेकडून मुलामा चढवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचे नव्याने परीक्षण करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना वापरण्यासाठी हा पूल खुला करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या पुलाला रॅम्प असून हा पूल सर्व फलाटांना जोडण्यात येणार आहे. सध्याच्या नव्या पुलाला एकही रॅम्प नसल्याने नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने रेल्वेकडून जुन्या पुलाची नव्याने चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 03:09 pm
धोकादायक पादचारी पुलाला नवा मुलामा

धोकादायक पादचारी पुलाला नवा मुलामा

पुणे स्थानकावरील जुन्या पुलाचे होणार अभियांत्रिकी परीक्षण

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुणे रेल्वे स्थानकातील ८० वर्षांहून अधिक जुन्या धोकादायक पादचारी पुलावर रेल्वेकडून मुलामा चढवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाचे नव्याने परीक्षण करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना वापरण्यासाठी हा पूल खुला करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या पुलाला रॅम्प असून हा पूल सर्व फलाटांना जोडण्यात येणार आहे. सध्याच्या नव्या पुलाला एकही रॅम्प नसल्याने नागरिकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने रेल्वेकडून जुन्या पुलाची नव्याने चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकाच्या इमारतीला दोन वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील. टप्प्या-टप्प्याने फलाटांची संख्या वाढल्यानंतर पादचाऱ्यांसाठी पूल उभारण्यात आला. हा पूल स्थानकातील सर्व फलाटांना जोडणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुलाला रॅम्प असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच तीन-चार बॅगा सोबत नेणाऱ्या प्रवाशांना ये-जा करताना फारसा त्रास होत नव्हता, पण दोन वर्षांपूर्वी हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. पुलाचे परीक्षण करून हा पूल धोकादायक बनल्याचे कारण त्यावेळी रेल्वे प्रशासनाने दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत केवळ ताडीवाला रस्त्याकडील बाजूनेच हा पूल खुला आहे. या बाजूला रॅम्प असून त्यावरून नव्या पुलावर जाता येते. 

स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजूने आलेल्या प्रवाशांसाठी एकही रॅम्प उपलब्ध नाही. त्यांना एकतर सरकता जिना किंवा पायऱ्यांवरूनच मुख्य पुलावर जावे लागते. तिथून प्रत्येक जिन्यावर चढ-उतार करण्यासाठी पायऱ्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचा प्रामुख्याने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही दिवसांपूर्वी पुण्यात दिव्यांगांची एक स्पर्धा झाली होती. त्यासाठी बेंगलोर येथील खेळाडू व्हीलचेअरवर आले होते. पण स्थानकात रॅम्प नसल्याने त्यांना रेल्वेमार्गावर सामानाची ने-आण करण्यासाठीच्या रस्त्याने ये-जा करावी लागली. याच रस्त्याचा वापर धोकादायक पध्दतीने अनेकजण करत आहेत. स्थानकातील या असुविधेबाबत अनेकांनी वारंवार तक्रार केली आहे. त्यावर रेल्वेने नव्या पुलावरून लिफ्ट व रॅम्प करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच पुणे रेल्वे स्थानकातील सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जुन्या पुलाची पाहणी करत तो पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हा पूल धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. पण पूल सर्वच प्रवाशांना खुला करण्याऐवजी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक किंवा इतर विशिष्ट प्रवाशांसाठी खुला करता येऊ शकतो. त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने पुन्हा परीक्षण करून पूल तात्पुरत्या स्वरूपात का होईना खुला करण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. त्यानुसार रेल्वेकडून चाचपणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याविषयी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, पूल बंद करेपर्यंत त्यावरून प्रवासी ये-जा करत होते. पण धोकादायक असल्याचे कारण कोरोना काळातच देण्यात आले. फलाट क्रमांक चार व पाचवर जाण्यासाठी एकच छोटा जीना आहे. एकाच वेळी दोन गाड्या आल्यानंतर लोकांना चालणेही शक्य होत नाही. अशा गर्दीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सामान घेऊन जाणे अशक्य आहे. याचा अनुभव महाव्यवस्थापकांनी घेतला आहे. त्यामुळे जुना पूल पुन्हा सुरू करणार असतील तर ते स्वागतार्हच आहे. लवकरात लवकर हा पूल सुरू करून प्रवाशांचा त्रास कमी करावा, अशी मागणी शहा यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story