फुकटच्या बिर्याणीबरोबर पैशांचीही मागणी !

फुकटात बिर्याणी दिली नाही म्हणून एकाने हॉटेल कामगाराला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिर्याणीबरोबर आरोपीने पैशांचीही मागणी केली होती. या प्रकरणी हॉटेल कामगाराने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताबडतोब आरोपीचा शोध घेत खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 17 Jun 2023
  • 11:38 pm
फुकटच्या बिर्याणीबरोबर पैशांचीही मागणी !

फुकटच्या बिर्याणीबरोबर पैशांचीही मागणी !

बिर्याणीसाठी कामगाराला मारहाण, मालकाला धमकावले, खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

फुकटात बिर्याणी दिली नाही म्हणून एकाने हॉटेल कामगाराला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिर्याणीबरोबर आरोपीने पैशांचीही मागणी केली होती. या प्रकरणी हॉटेल कामगाराने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून  ताबडतोब आरोपीचा शोध घेत खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. रोहन ऊर्फ रॉबर्ट दीपक ससाणे असे आरोपीचे नाव असून तो येरवडा येथील यशवंतनगर येथील भोसले वस्तीत राहावयास आहे. त्याच्यावर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 

येरवड्यातील यशवंतनगर येथे मोठ्या संख्येने हॉटेल असून तेथे न्यू ड्रॅगन चायनीज कॉर्नर नावाचे एक छोटेसे हॉटेल आहे.  गुरुवार, १५ जून रोजी आरोपी ससाणे हा हॉटेलमध्ये जेवायला आला. यावेळी त्याने बिर्याणी मागितली. सोबत एक सिगारेटचे पाकीट आणि त्याशिवाय दोन हजार रुपयेही मागितले. हे सर्व मोफत मागितल्याने हॉटेल मालकाने त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रोहनने हॉटेल मालकाचा भाऊ नौशाद  शेख यांना शिवीगाळ केली. तसेच मोफत बिर्याणी दिली नाही तर हॉटेल बंद करण्याची धमकी दिली.

संतापलेल्या ससाणे याने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून नौशाद शेख यांच्या अंगावर भिरकावला. शेख यांनी चपळाईने बाजूला होत तो चुकवला. मात्र शेख यांच्या पाठीमागे उभा असलेला कामगार वसंत गणेश मगर याला तो लागला. त्यामुळे मगर याचे नाक फुटले व मोठी जखम झाली आहे. मगर हा मूळचा नेपाळचा असून येथे कामासाठी आलेला आहे. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गुरव हे करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story