क्षेत्रीय कार्यालयाच्या ‘बुडाखाली अंधार’
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
पाऊस सुरू होण्यापूर्वी पावसाळी गटारांची कामे करा, रस्त्यावरील विकासकामांचा राडारोडा साफ करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयासमोरच मात्र, रस्त्याच्या कामांचा राडारोडा, पावसाळी गटारातून काढलेली घाण आणि अर्धवट उखडलेले पदपथ दिसून येत आहेत.
पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी १ जून रोजी संयुक्त बैठकीत केली होती. पोलीस आयुक्त, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, महामेट्रो, टाटा मेट्रो, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पीएमपीएमएलचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक यंत्रणांनी आपापली कामे उरकून घ्यावी आणि पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सज्ज राहावे, यासाठी ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
शहरात विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीने कामे पूर्ण करावीत. नेहमी पाणी साठणाऱ्या ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणांनी लक्ष ठेवावे. क्षेत्रीय कार्यालयांनी आपापल्या हद्दीतील पावसाळी गटारांची कामे करावी. नाल्यातील कचरा साफ करावा, असे आदेश या बैठकीनंतर देण्यात आले होते. मात्र अजूनही विकासकामांचे अवशेष रस्त्यावर दिसून येत आहेत. अनेक ठिकाणचे खड्डे बुजवले गेले नाहीत. सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाबाहेरच राडारोडा पडून आहे. कात्रज डेअरी चौकात राजीव गांधी उद्यानासमोर रस्त्याचे काम करण्यात आले.
त्याचा राडारोडा रस्त्याच्या कडेला तसाच पडून आहे. हा राडारोडा क्षेत्रीय कार्यालयापासून अवघ्या शंभर मीटरवर आहे. क्षेत्रीय कार्यालयासमोरच पावसाळी गटारातून काढलेली घाण पडून आहे, तर क्षेत्रीय कार्यालयापासून शंभर ते दीडशे मीटरवर असलेल्या भारती विद्यापीठ भुयारी मार्गासमोरील पदपथ उखडले आहेत. अर्धवट अवस्थेतील पदपथाचे काम तसेच पडून आहे. त्याचा राडारोडा आणि पाईप पदपथावर पडून आहेत.
स्थानिक रहिवासी आदित्य गायकवाड म्हणाले, ‘‘कात्रज डेअरीकडून राजीव गांधी उद्यानाकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नव्हता. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यात आला. त्याचा राडारोडा बाजूलाच टाकण्यात आला आहे. एका महिन्यापासून तो तसाच पडून आहे. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा राडारोडा पडून आहे. क्षेत्रीय कार्यालयासमोरचा राडारोडा उचलला जात नसेल तर, इतर ठिकाणची अवस्था काय असेल?’’
‘‘पावसाळ्यापूर्वी गटारातील घाण काढली जाते. मात्र, त्याचा राडारोडा त्याच गटाराच्या झाकणाशेजारी पडून असतो. पाऊस झाल्यावर तीच घाण पुन्हा गटारात जाते. मग, पावसाळी गटारे साफ करण्यात काय अर्थ आहे? क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळच राडारोडा पडलेला दिसून येतो. कार्यालयासमोरच अशी स्थिती असणे योग्य नाही. दिव्याखालीच अंधार असल्याचे त्यावरून लक्षात येते,’’ अशी प्रतिक्रिया कात्रज येथील सामाजिक कार्यकर्ते राजू कदम यांनी व्यक्त केली.