'डाॅलीं'चा आळंदीत सुळसुळाट

आळंदीत लग्नाच्या नावाखाली विवाह इच्छुक तरुणांची आर्थिक फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशाच प्रकरणात एकाच घरातील दोन मुलांची फसवणूक झाली असून मुलाच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मंगल कार्यालय चालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 26 Jun 2023
  • 08:48 am
'डाॅलीं'चा आळंदीत सुळसुळाट

'डाॅलीं'चा आळंदीत सुळसुळाट

दोन प्रकरणातील वधूंनी लग्नानंतर स्त्रीधन, अन्य दागिने घेऊन केला पोबारा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आळंदीत लग्नाच्या नावाखाली विवाह इच्छुक तरुणांची आर्थिक फसवणूक होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशाच प्रकरणात एकाच घरातील दोन मुलांची फसवणूक झाली असून मुलाच्या वडिलांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मंगल कार्यालय चालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोलते यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आळंदी येथील एक मुलगी पाहिली होती. मुलगी पसंत पडल्यावर पुढे लग्नाची बोलणी सुरू झाली. लग्न झाल्यावर पैसे द्यावे लागतील असे जमवणाऱ्याने सांगितले होते. फिर्यादींनी ठरल्याप्रमाणे पैसे दिले, २० मे रोजी आळंदीमधील जय अंबे मंगल कार्यालयात लग्न लागले. तसेच फिर्यादीच्या पुतण्यालाही एक मुलगी पाहिली. त्याचेही २३ मे रोजी आळंदीतील जोशी मंगल कार्यालयात लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर नोंदणीची कागदपत्रेही त्यांना देण्यात आली. मात्र लग्न झाल्यावर काहीच दिवसात लग्न केलेली कथित वधू घरातील सोने घेऊन पळून गेली. फिर्यादींनी मध्यस्थाकडे चौकशी केल्यावर तिचे दुसरीकडे लग्न लावले आहे. आता तुम्ही तिचा विचार आणि विषय सोडून द्या असे सांगितले. फिर्यादींची एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी शनिवार दि. २४ रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समाधान डोंगरे रा. चर्‍होली बुद्रुक, परमेश्वर गोरखनाथ दरोडे, जनककुमार अमृतलाल जोशी, रोहिदास भैरवनाथ डवरी (सर्व रा. आळंदी), कल्पना संतोष पवार (रा. तामाणगाव, रायगड) आणि अंजली मोहन भोसले (रा. गौतमनगर, सांगवी, नांदेड) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  फिर्यादी आणि त्यांचा लहान भाऊ त्यांच्या मुलांसाठी मुली शोधत होते. समाधान डोंगरे हा लग्न जमवण्याचे काम करतो अशी माहिती मिळाली. समाधान डोंगरे याने काही मुलींचे फोटो पाठविले. तुम्ही आळंदीत या, येथेच पाहण्याचा कार्यक्रम करू. मुलगी पसंत पडली तर लगेच लग्न करूया, लग्नासाठी तुम्हाला ३ लाख रुपये द्यावे लागतील. तसेच मुलीला लग्नात सोन्याचे मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवे घ्यावे लागतील असे सांगितले. त्यांना कल्पना संतोष पवार ही मुलगी पसंत पडली. त्यानंतर २० मे रोजी त्यांनी आळंदी येथे जय अंबे मंगल कार्यालयात ३ लाख  रुपये देऊन आपल्या मुलाचे लग्न लावले.

लग्नात समाधान डोंगरे याने परमेश्वर दराडे याची ओळख करून दिली. त्यानंतर फिर्यादीच्या भावाच्या मुलासाठी अंजली मोहन भोसले ही पसंत पडली. पहिल्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या पुतण्याचे २३ मे रोजी जोशी मंगल कार्यालयात विवाह होऊन नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर ते भोकरदन येथील गावी आले. लग्नानंतर काही दिवस दोन्ही सुना सगळ्यांशी प्रेमाने मिळून मिसळून वागत होत्या. १५ जून रोजी पहाटे दोन्ही सुना लग्नातील स्त्रीधन, फिर्यादीच्या पत्नीची अडीच तोळ्यांची सोन्याची पोत घेऊन पळून गेल्या. मध्यस्थ समाधान डोंगरे व परमेश्वर दराडे यांच्याशी फिर्यादींनी संपर्क साधल्यावर त्यांनी दोन्ही मुलींची आम्ही दुसरीकडे लग्न लावून दिलेली आहेत. त्या दोन्ही मुली परत येणार नाहीत. हा विषय इथेच संपवा, असे सांगून त्यांना धमकावले. मुलींच्या आधार कार्डवरील पत्त्यावर तसेच दोघा मध्यस्थांबाबत त्यांनी चौकशी केली. तेव्हा डोंगरे आणि दराडे हे मुलींची बनावट आधार कार्ड, कागदपत्रे बनवतात. जोशी मंगल कार्यालयाचे आणि जय अंबे मंगल कार्यालयाचे मालक जनककुमार अमृतलाल जोशी हे रोहिदास डवरी याला हाताशी धरतात. मुलांना लग्नासाठी मुली दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन लग्न लावून देतात. त्यानंतर पुन्हा त्याच मुलींची दुसर्‍या मुलांबरोबर लग्न लावतात.

फिर्यादी यांनी घरातील १० शेळ्या, गायी, शेती विकून लग्नासाठी पैसे जमवले होते. याबाबत त्यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसात तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर गेलेले पैसे मिळावेत अशी त्यांची भावना आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी  पोलीस उपनिरीक्षक रोहन गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की लवकरात लवकर आरोपीना शोधून अटक केली जाईल. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story