Rupees
गुंतवणुकीवर सहा महिन्यांत दामदुप्पट पैसे आणि दहा महिन्यांसाठी दरमहा दहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फरार संचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षी गुन्हा दाखल झाला होता.
गुंतवणूकदारांमध्ये बहुतांश लोक हे नोकरदार आहेत. अनेकांनी तर पगारातून मिळणारी रक्कम पै-पै करून साठविल्यावर जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आयुष्यभराची कमाई गुंतवली होती. कंपनीने लोकांचे पैसे जमा झाल्यावर कार्यालयाला कुलूप ठोकून पळ काढला होता. सुनील जनार्दन झांबरे (वय ४७, रा. सिद्धी विनायक रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी) असे अटक केलेल्या जेबीसीच्या संचालकाचे नाव आहे, तर राहुल गुलाबसिंग जाखड, रामहरी ज्ञानदेव मुंढे, माधव रघुनाथ चासकर, विश्वास रामचंद्र भोर, नवनाथ एकनाथ रेपाळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रवींद्र मुरलीधर हगवणे (वय ४६, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
काळभोरनगर, चिंचवड येथे जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ऑफिस थाटले होते. संचालक जाखड, मुंढे व झांबरे यांच्यासह मुख्य एजंट रेपाळे, एजंट चासकर, भोर यांनी १० महिन्यांत दरमहा १० टक्के परतावा आणि सहा महिन्यांत दामदुप्पट मुदत ठेवीच्या योजनांमध्ये लोकांना पैसे गुंतविण्यास सांगितले होते.
मोठा परतावा आणि दामदुप्पट या आमिषाला बळी पडून अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. हगवणे दाम्पत्याने साडेसात लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच अन्य लोकांनाही अशाच प्रकारे आमिष दाखविल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. हगवणे यांना त्याच्या गुंतवणुकीपोटी मूळ रक्कम आणि त्यावर ४ लाख ९७ हजार रुपये परतावा दिला जाणार होता.
लोकांचा विश्वास संपादन होण्यासाठी जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी आणि पैसे घेणाऱ्या एजंटांनी सुरुवातीला लोकांना दरमहा १० टक्के या हिशेबाने पैसे देऊ केले होते. दरमहा सांगितल्याप्रमाणे पैसे मिळत असल्याने हगवणे यांच्यासह शहरातील अनेकांनी मोठी रक्कम जेबीसी या कंपनीत गुंतवली होती. मात्र, मोठी रक्कम हाती येताच कंपनीच्या संचालकांनी कार्यालय बंद करून पळ काढला.
दरमहा येणारी रक्कम न मिळाल्याने ठेवीदारांनी जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय गाठल्यावर तिथे कोणीच नसल्याचे लोकांच्या लक्षात आले. हा प्रकार २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला होता. कंपनीला टाळे लागल्याचे दिसल्यानंतर गुंतवणूकदारांनी संचालकांना फोन करण्यास सुरुवात केली. मात्र, कोणाचाही संपर्क होत नव्हता. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम आणि त्यापोटी मिळणारा परतावा अशा सुमारे एक कोटी ३३ लाख १३ हजार ६४३ रुपयांची फसवणूक झाल्याने सर्व गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलिसांकडे तक्रार केली.
विना परवाना थाटले दुकान...
पिंपरी पोलिसांनी जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची चौकशी केल्यावर या कंपनीकडे रिझर्व बँकेचा दामदुप्पट मुदत ठेवीचा परवाना नसल्याचे उघड झाले होते. तसेच कंपनीने पिंपरी-चिंचवड येथील कार्यालय बंद करून सर्वजण पसार झाल्याने पिंपरी पोलीस ठाण्यात सर्व संचालक आणि एजंटवर फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
``गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेवीदारांची संख्या वाढत गेली. या प्रकरणी यापूर्वी काही संचालक आणि एजंटला अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी पैशांची गुंतवणूक करताना कंपनी कोणती आहे. तसेच कंपनीकडे रिझर्व बँकेचा परवाना आहे का याची खातरजमा करणे आवश्यक असून, यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते``, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी `सीविक मिरर`शी बोलताना सांगितले.