फक्त ५ सेकंदात ओलांडा ६० मीटर अंतर

शहरातील चौकात पादचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेल्या सिग्नलची वेळ खूपच कमी असल्याची बाब समोर आली आहे. अवघ्या ३ ते ८ सेकंदाचाच वेळ पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी देण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 14 Jul 2023
  • 12:28 am
फक्त ५ सेकंदात ओलांडा ६० मीटर अंतर

फक्त ५ सेकंदात ओलांडा ६० मीटर अंतर

सिग्नलवरील वेळेच्या अपुऱ्या काउंटडाऊनमुळे पादचाऱ्यांची दैना, सिग्नल बदलण्याची वाहतूकतज्ज्ञांची मागणी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरातील चौकात पादचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेल्या सिग्नलची वेळ खूपच कमी असल्याची बाब समोर आली आहे. अवघ्या ३ ते ८ सेकंदाचाच वेळ पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या कमी वेळेत रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांना शक्य होत नाही. यामध्ये अपघात होण्याची शक्यता असल्याने सिग्नलचा वेळ वाढवण्यात यावा, अशी मागणी 'सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट'चे अध्यक्ष हर्षद अभ्यंकर यांनी केली आहे.

स्मार्ट सिटीचा बराच गाजावाजा झालेल्या प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये शहरातील १२५ चौकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील साधारण ४० चौकांमधील सिग्नल मे महिन्यात कार्यान्वित करण्यात आले आहेत. आतापर्यंत या प्रणालीद्वारे बसवण्यात आलेल्या सिग्नलची संख्या ही ८५ असल्याची माहिती अभ्यंकर यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली आहे. मात्र एकीकडे याची अंमलबजावणी पुढे सरकत असताना ज्या चौकामध्ये पादचारी सिग्नल बसवण्यात आले आहेत,  त्यांची दुरावस्था झालेली पाहावयास मिळते. प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीद्वारे पहिल्या टप्प्यातील ४० चौकांमध्ये सिग्नल बसवण्यात आले होते. या प्रणाली अंतर्गत बसवण्यात आलेल्या पादचारी सिग्नलमध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी केवळ ३ ते ८ सेकंदांचा वेळ दिला जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची त्रेधा उडत आहे. याशिवाय या चुकीच्या काउंटडाऊनमुळे अपघातांची शक्यता असून शहरातील असे सिग्नल्स बदलण्याची मागणी वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे.

कर्वे रस्त्यावरील हुतात्मा राजगुरू चौकामधील पादचाऱ्यांसाठी बसवलेला सिग्नल बंद आहे, तर दुसरीकडे जे सिग्नल सुरू आहेत त्यांचा वेळ इतका कमी आहे की तेवढ्या वेळात अर्धा रस्ताही ओलांडता येत नाही. यामध्ये वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींना तो ओलांडणे अशक्यच आहे पण तरुणांनाही इतक्या कमी वेळात रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. विधी महाविद्यालय रस्ता आणि भांडारकर रस्त्यावरील चौकात असलेल्या सिग्नलची वेळ पादचाऱ्यांसाठी फक्त ५ सेकंदाची आहे. सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड जवळील सिग्नलची वेळ पादचाऱ्यांसाठी फक्त ८ सेकंदाची आहे. नळ स्टॉप येथील असलेल्या सिग्नलची वेळ ८ सेकंदाची असल्याची बाब समोर आली आहे.

इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ता ओलांडण्यासाठीचा वेळ त्यांनी ठरवला आहे. रस्त्याच्या रुंदीनुसार पादचाऱ्यांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यातील कमीत कमी वेळ १५ ते २० सेकंद तरी हवी, असे सांगण्यात आले आहे. मात्र पालिका प्रशासनाला त्याचाही विसर पडल्याचे दिसून येत आहे. यंत्रणा जुन्या पद्धतीची असो किंवा स्मार्ट असो.  त्यात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मात्र अजूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सिग्नलचे प्रोग्रॅमिंग महापालिकेचा विद्युत विभाग करतो. या विभागातील अधिकाऱ्यांनी ७ सेकंदांमध्ये हा रस्ता ओलांडून दाखवावा, असे आवाहन सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंटकडून करण्यात आले आहे.

इतक्या कमी वेळात रस्ता ओलांडत असतानाच अर्ध्या रस्त्यावर असताना पादचाऱ्यांसाठी असलेला हिरवा दिवा जाऊन लाल दिवा लागला आणि नंतर आलेल्या वाहनांना धडकून अपघात झाला तर त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार का, असा नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे. वेळ कमी असल्यामुळे पादचारी त्यांना हवा तेव्हा रस्ता ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते अधिक धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच चौकामधील काही सिग्नल पावसाचे पाणी जाऊन, वायर तुटल्यानंतर त्यातील दिवे बंद झाले तर ते दुरुस्तीच्या वेळी काही वेळा पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलची वायर काढून ती मुख्य वाहनांसाठी असलेल्या सिग्नलला जोडली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असलेले सिग्नल अनेकदा बंद असतात. पादचाऱ्यांसाठी असलेले सिग्नल सुरू करण्यासाठी वाहतूक पोलीसही तक्रार करत नाहीत. पालिकाही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे, अभ्यंकर म्हणाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story