अतिक्रमण विभागात दहा तृतीयपंथी व्यक्तींची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

सार्वजनिक मालकीच्या जागेवर, रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करणे महापालिकेसाठी डोकेदुखीची बाब असते. कारवाई दरम्यान संबंधितांचा रोष सहन करावा लागतो. अनेकवेळा कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांवर हल्लेही केले जातात. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाच्या आव्हानात्मक कामात आता तृतीयपंथी व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 22 Jun 2023
  • 12:16 am
अतिक्रमण विभागात दहा तृतीयपंथी व्यक्तींची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

अतिक्रमण विभागात दहा तृतीयपंथी व्यक्तींची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

अतिक्रमण कारवाईदरम्यान होणारे कर्मचाऱ्यांवरील संभाव्य हल्ले तृतीयपंथी परतवणार, पुरुष कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेची नामी शक्कल, १० जणांची विभागात वर्णी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

सार्वजनिक मालकीच्या जागेवर, रस्त्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करणे महापालिकेसाठी डोकेदुखीची बाब असते. कारवाई दरम्यान संबंधितांचा रोष सहन करावा लागतो. अनेकवेळा कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांवर हल्लेही केले जातात. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाच्या आव्हानात्मक कामात आता तृतीयपंथी व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागात दहा तृतीयपंथी व्यक्तींची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे.त्यामुळे यापुढे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत हे तृतीयपंथीही हिरीरीने सहभागी होणार आहेत. तृतीयपंथींना रस्त्यावर उतरून काम करण्याची (फिल्डवर्क) संधी देणारी पुणे महापालिका पहिली महापालिका ठरणार आहे.

समाजातील इतर घटकांप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तींना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी 'द ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) अक्ट' २०१९ तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत तृतीयपंथींच्याही हक्कांचे संरक्षण करण्यात आले आहे. तृतीयपंथींना समाजात वावरताना भेदभावाची वागणूक देऊ नये, त्यांची स्वतंत्र ओळख असावी, त्यांना शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा मिळावी, आरोग्याच्या स्वतंत्र सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. 

त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने काही तृतीयपंथींना नोकरीत सामावून घेतले आहे. तृतीयपंथींनी केलेल्या संघर्षानंतर पोलीस भरतीच्या अर्जात पुरूष आणि महिलांबरोबर तृतीयपंथींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिकेने तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, १३ क्षेत्रिय कार्यालयातील ३७ ठिकाणे निश्चितही केली आहेत.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या या निर्णयाचे अनुकरण करत पुणे महापालिकेने त्यांच्यासाठी नोकरभरती प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काही तृतीयपंथींना नुकतीच संधी देण्यात आली आहे. महापालिकेच्या काही रुग्णालयांत ते सुरक्षारक्षक म्हणूनही काम करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करण्याची संधी अद्याप कोणत्याही महापालिकेने अथवा इतर सरकारी कार्यालयाने दिलेली नाही. पुणे महापालिकेच्या इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काही तृतीयपंथींची नियुक्ती केली जाणार आहे. आता त्यांना फिल्डवर्क देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची सुरूवात अतिक्रमण विभागाकडून होणार आहे.  

अतिक्रमण विभागात दहा तृतीयपंथींची कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आली आहे. येत्या १ जुलैपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागात ते सुरक्षारक्षक म्हणून समाविष्ट होतील. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर असलेले अतिक्रमण हटवताना तृतीयपंथी आघाडीवर दिसणार आहेत. सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक समजले जाते. त्यात संबंधित व्यावसायिकांशी अनेकदा संघर्ष होतो. गेल्या काही महिन्यांत कारवाईदरम्यान महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अतिक्रमण हटवताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महिलांकडूनही अरेरावी सहन करावी लागते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ताफ्यात कारवाई दरम्यान महिला अपवादानेच असतात. त्यामुळे महिला आणि पुरूष अशा दोघांना हाताळण्यासाठी तृतीयपंथी कर्मचाऱ्यांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल, असे सांगितले जात आहे.

'फ्लाईंग वूमन फाऊंडेशन'च्या संस्थापक अध्यक्ष छायावती देसले म्हणाल्या, अतिक्रमण विभागातील काम अत्यंत धावपळीचे असते. अतिक्रमण हटवताना कर्मचाऱ्यांना अनेकदा अरेरावीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीचा सामना तृतीयपंथी कर्मचारी चांगल्या पद्धतीने  करू शकतील. अतिक्रमण विभागातील जबाबदारी ते चोखपणे पार पाडतील. फिल्डवरील काम करताना त्यांच्या पोषाखाचाही विचार करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान त्यांचा पोशाख शर्ट -पँट असा असणार आहे. कारवाई दरम्यान हा पोषाख सोयीचा ठरेल. तसेच, त्यांना वावरताना कोणतीही अडचण येणार नाही, अशी भूमिका त्यामागे होती.

तृतीयपंथींना नोकरीची संधी देण्यासाठी पुणे महापालिकेने उचललेले पाऊल चांगले आहे. तृतीयपंथींची कंत्राटी भरती करण्याऐवजी त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जावी. कंत्राटी भरतीची आवश्यकता भासल्यास, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना कंत्राट दिले जावे. कारण, तृतीयपंथींच्या समस्यांची त्यांना जाणीव असते. तसेच, तृतीयपंथी व्यक्ती अशा संस्थांच्या संपर्कात असतात, असे देसले म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story