‘झुकेगा नहीं साला’च्या पवित्र्यामुळे चंदनचोर मुजोर

शहरातील विविध भागांत चंदनचोरांचा सुळसुळाट असल्याचे मागील काही दिवसातील घटना पाहता दिसून येत आहे. आता तर अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या लष्करी शारीरिक प्रशिक्षण संस्थेच्या (एआयपीटी) अतिसुरक्षित परिसरातील चंदनाची दोन झाडे कापून नेईपर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 19 Jun 2023
  • 12:20 am
‘झुकेगा नहीं साला’च्या पवित्र्यामुळे चंदनचोर मुजोर

‘झुकेगा नहीं साला’च्या पवित्र्यामुळे चंदनचोर मुजोर

पुण्यातील अतिसुरक्षित लष्करी शारीरिक प्रशिक्षण संस्थेमधील दोन झाडे नेली कापून

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरातील विविध भागांत चंदनचोरांचा सुळसुळाट असल्याचे मागील काही दिवसातील घटना पाहता दिसून येत आहे. आता तर अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या लष्करी शारीरिक प्रशिक्षण संस्थेच्या (एआयपीटी) अतिसुरक्षित परिसरातील चंदनाची दोन झाडे कापून नेईपर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे.

चंदनमाफियांनी शहरात केलेल्या चोरीच्या अनेक घटना ताज्या असताना त्यात ही नव्याने भर पडली आहे. त्यामुळे हे चंदनचोर चोरी करण्यास ‘झुकेगा नहीं’ याच पवित्र्यात असल्याचे दिसते.  एआयपीटीच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद जाधव यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोलापूर मार्गावरील रामटेकडी येथील एआयपीटीच्या गेस्ट हाऊसमधून गुरुवारी (दि. १५) रात्री चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत प्रमोद जाधव यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते एआयपीटीच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अंमलदार संदेश राऊत करत आहेत.

तपास अधिकारी संदेश राऊत यांनी ‘सीविक मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘‘एआयपीटी येथील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी धारदार करवतीने किंवा कुऱ्हाडीने कापले आहे. गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली. यातील आरोपींचा शोध सुरू आहे. येथील आवारात अनेक प्रकारची झाडे आहेत. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मागील बाजूने येऊन दोन चंदनाची झाडे कापली आहेत. ३० हजार रुपये किमतीची ही झाडे होती.’’

यापूर्वी २७ एप्रिल रोजी सुरक्षारक्षकाला धमकावून चार चोरट्यांच्या टोळीने कोरेगाव पार्क येथील अंजुमन-ए-इस्लामच्या अहमद पीर मोहम्मद शाळेतील चार चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली होती. २७ मे रोजी शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या आवारातून एक चंदनाचे झाड तोडून त्याचे तुकडे वाहून नेले होते. यापूर्वी ३० जानेवारी रोजी कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमातून तीन चंदनाची झाडे चोरीला गेली होती. या चंदनचोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चंदनाचा वापर अनेक व्यक्ती विविध उद्देशांसाठी करतात. ते मंदिरात गंध म्हणून लावले जाते.  घरे सजवण्यासाठी चंदनाच्या लाकडाचा वापर करतात. काही लोक हवन साहित्य, अगरबत्ती इत्यादी पूजेच्या वस्तू तयार करण्यासाठी चंदनाच्या लाकडाचा वापर करतात. चंदनाचे तेल खूप मौल्यवान आहे. चंदनाचे लाकूड उच्च दर्जाचे असल्यामुळे ते खूपच महाग आहे. यामुळे साहजिकच चोरट्यांची चंदनाच्या झाडावर वक्रदृष्टी असते.

‘‘चंदनामध्ये ताप कमी करणारे (अँटिपायरेटिक), बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे  (अँटिस्कॅबेटिक) आणि लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्मांसह अनेक उपचारात्मक वैशिष्ट्यांची विस्तृत श्रेणी आहे. हे ब्राँकायटिस, सिस्टिटिस (मूत्राशय जळजळ), डिस्युरिया (मूत्रात जळजळ) आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरदेखील फायदेशीर ठरते. दुसरीकडे, लाल चंदनामध्ये दाहविरोधी, अँटिऑक्सिडेंट आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात,’’ असे चंदनाचे जाणकार सांगतात.  शहरातून सातत्याने चोऱ्या करणाऱ्या अशा चंदनचोरांना तातडीने पकडले नाही तर त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक उरणार नाही. ते शहरातील सगळेच चंदन संपवून टाकतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story