कारनामा
नितीन गांगर्डे
चंडीगड राज्यातील नोंदणी क्रमांक असलेली लक्झरी चारचाकी पुण्यात कागदपत्रांशिवाय आणि राज्य सरकारचा कर न भरता फिरवणे मालकाला चांगलेच महागात पडले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संबंधित मालकावर कारवाई केली असून, त्याची तब्बल २३ लाख २० हजार रुपयांच्या कराची थकबाकी असल्याची बाबही उघड केली आहे. हा 'कार'नामा गाडीच्या मालकाला चांगलाच महागात पडला आहे.
महाराष्ट्र सरकारला कर भरण्याचे बाकी असल्याने आणि गाडीची आवश्यक ते कागदपत्र पूर्ण नसल्याने ही कारवाई केल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे. सध्या ही गाडी परिवहन विभागाच्या कार्यालयात जप्त करून ठेवण्यात आली आहे. थकलेला पूर्ण कर भरून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच कार सोडण्यात येईल असे विभागातील अधिकाऱ्यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी एक लक्झरी कार शहरात फिरत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही कार अधिकाऱ्यांनी कल्याणीनगर येथे थांबवली व तिच्या चालकाला आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, चालकाकडे कागदपत्रे नसल्याचे समोर आले. तसेच, त्यांनी महाराष्ट्र सरकारचा कर
भरल्याची पावतीही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लक्झरी कारवार कारवाई केली आणि तिला ताब्यात घेतले. चालक जोपर्यंत दंड जमा करत नाहीत, तोपर्यंत ही कार जप्त राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या कारचा नंबर सीएच ०१ सीई ७४४७ असा नंबर असून ती मूळची चंडीगड राज्यातील आहे. आवश्यक ते कागदपत्र नसल्याने कारला मेमो दिला आहे. एम एच ७०४०८२३०७२५१४१२२४ असा त्याचा नंबर आहे. शिवाय तिच्यावर ५ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या लक्झरी कारचा मालक चंडीगड राज्यातील आहे. माझेन पराग मोडी असे त्याचे नाव असून, चंडीगड येथील विल बाधेरी येथील ते रहिवासी आहेत. त्यांनी गुरूवारी (३ ऑगस्ट) महाराष्ट्र शासनाचा २३ लाख २० हजार रुपये हा शिल्लक असलेला कर भरला असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय भोर यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले. कल्याणीनगर येथे दुपारी या कारवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारचालकानेच चालवत तिला प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात आणून पार्क केली. मोटार वाहन निरीक्षक आशिष पाराशर, जयंत मोरे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दीपक राऊत, सुचित्रा पाटील, अमोल दांडेकर आणि वाहनचालक शिवाजी गायकवाड या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दैनंदिन वाहन तपासणीची कारवाई करत असताना ही कार आढळून आली असल्याचे संजय भोर यांनी मिररशी बोलताना सांगितले पुणे शहरात लक्झरी कार फिरत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरातील उचभ्रू नागरिक आपली हौस, चैन, कम्फर्ट, प्रतिष्ठेचे प्रतीक अशा विविध कारणांसाठी उंची, महागड्या, लक्झरी कारची खरेदी करतात. शहरात व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, पर्यटनासाठी अशा विविध कारणांसाठी बाहेरून आलेले काही नागरिकही अशा कार वापरत असल्याचे पाहायला मिळते आहे. या कारची किंमत ५० लाख रुपयांपासून ते काही कोटींपर्यंत असते. इतर कारच्या तुलनेत त्या आरामदायी, वेगाने धावणाऱ्या, दणकट असतात.