मुख्यमंत्र्यांना गद्दार संबोधले, गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी समाजमाध्यमावर गद्दार, माकड असा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 19 Jun 2023
  • 12:22 am
मुख्यमंत्र्यांना गद्दार संबोधले, गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांना गद्दार संबोधले, गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी समाजमाध्यमावर गद्दार, माकड असा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर शंकरराव कुरुमकर (वय ५७, रा. शुक्रवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘ट्विटर’वर अभय नाव असलेल्या खात्याच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरुमकर हे शिवसेना (िशंदे गट) उपशहर प्रमुख आहेत. ट्विटर या समाजमाध्यमावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याची माहिती त्यांना समजली. त्यानंतर कुरुमकर यांनी हे खाते पाहिले असता त्यावर मुख्यमंत्र्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. मुख्यमंत्र्यांविषयी असलेली ही पोस्ट शुक्रवारी (दि. १६) सकाळी ११.४२ वाजता टाकण्यात आली होती. ती हजारो लोकांनी पाहिली आहे. या पोस्टला ९७३ रीट्विट, ६,२६० लाईक्स आणि २७२ बुकमार्क आहेत. त्यानंतर फिर्यादी यांनी ही आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभय नामक द्विटर खात्याची पाहणी केली. या खात्यावरून यापूर्वी अनेकदा अशा पोस्ट करण्यात आल्याचे लक्षात आल्याचे कुरुमकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याच खात्यावर २६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून अपशब्दांचा वापर करण्यात आला. त्याखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देत असतानाचा फोटो प्रकाशित केला आहे. त्या फोटोमध्ये शिंदे हे गृहमंत्र्यांच्या बाजूला उभे आहेत. त्या पोस्टमध्ये ‘‘कुठे नेऊन ठेवलाय मुख्यमंत्री,’’ असे म्हणत वाईट शब्दांचा वापर केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून ‘‘पहा ते गद्दार शिंदे, मुख्यमंत्री आहे आणि कसा साईडला उभं आहे, अरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे. कसा रुबाब असला पाहिजे, अन् हे माकड साईडला उभं राहून फोटो काढतंय,’’ अशी पोस्ट टाकली असून त्याखाली ‘‘कुठे नेऊन ठेवलाय मुख्यमंत्री आमचा कोपऱ्यात डायरेक्ट’’ असा उल्लेख केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनात्मक पदांवरील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीबाबत बदनामीकारक आणि अपशब्दाचा वापर केला आहे. तो ट्विटर समाजमाध्यमावर प्रसारित केला आहे. यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे कुरुमकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ४६९, ४९९ आणि ५०० या कलमान्वये अभय नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण मदने पुढील तपास करत आहेत.

अभय नामक ट्विटर अकाउंटवरून गेल्या अनेक दिवसांपासून बदनामीकारक मजकूर, मॉर्फ केलेले फोटो तसेच आक्षेपार्ह लिखाण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी शिंदे गटाने पोलीस आयुक्तांकडे केली. यावेळी शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी जमले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story