गुंडगिरी परवडली; कचरा नको

पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग मध्यंतरी गुजरातच्या वाटेवर होते. कंत्राटासाठी वाढलेली स्पर्धा आणि त्यातून कंपनीच्या मालकांना आणि अधिकाऱ्यांना होणारी मारहाण आणि गुंडगिरी ही त्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते. मात्र, आता उद्योजक कचऱ्याच्या प्रश्नाने त्रस्त आहेत. त्यामुळे आता उद्योजक एक वेळ ती गुंडगिरी परवडली, पण कचरा व दुर्गंधी नको, असे म्हणत आहेत.

गुंडगिरी परवडली; कचरा नको चाकण औद्योगिक वसाहतीतील कचराप्रश्न तातडीने न सुटल्यास बाहेर पडण्याचा उद्योजकांचा इशारा

गुंडगिरी परवडली; कचरा नको

चाकण औद्योगिक वसाहतीतील कचराप्रश्न तातडीने न सुटल्यास बाहेर पडण्याचा उद्योजकांचा इशारा

देवेंद्र शिरूरकर

devendra.shirurkar@civicmirror.in

TWEET@devendrashirur1

पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग मध्यंतरी गुजरातच्या वाटेवर होते. कंत्राटासाठी वाढलेली स्पर्धा आणि त्यातून कंपनीच्या मालकांना आणि अधिकाऱ्यांना होणारी मारहाण आणि गुंडगिरी ही त्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते. मात्र, आता उद्योजक कचऱ्याच्या प्रश्नाने त्रस्त आहेत. त्यामुळे आता उद्योजक एक वेळ ती गुंडगिरी परवडली, पण कचरा व दुर्गंधी नको, असे म्हणत आहेत. 

औद्योगिक परिसरात जागोजागी साचलेल्या  कचऱ्याच्या ढिगामुळे कचरा अनेक दिवसांपासून साठल्याने तो कुजला आहे आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी अथवा आम्हाला बाहेर जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाच हजारांहून अधिक संख्येने अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. सुमारे दोन लाखांवर कामगारवर्ग आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. दुचाकी, चारचाकी, इतर अवजड वाहने, अर्थमूव्हर्स मशिनरी आदी येथे बनवल्या जातात. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुटे पार्ट व इतर साहित्य पुरवणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या चाकणमध्ये आहेत. कंपन्यांना कामगार पुरविणारे ठेकेदार व इतर साहित्याचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या या भागात हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आता येथील कचरा संकलित करून तो टाकायचा कोठे, हाही प्रश्न कंपन्यांना भेडसावतो आहे.

काही ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसतात. हा कचरा काही प्रमाणात औद्योगिक वसाहतीमधील गावातील ग्रामपंचायती, हॉस्पिटल, हॉटेल व्यवसायिकांसह रहिवाशांचाही आहे. कचरा रात्रीच्या वेळी अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाकला जातो. त्यामुळे वसाहतीतील रस्ते दुर्गंधीने व्यापले आहेत.  कंपन्यांतील कचरा संकलित करून तो एका ठिकाणी विघटित करण्याची गरज आहे. या परिसरात कचरा प्रक्रिया केंद्र उभारावे, अशी अनेक उद्योजकांची मागणी आहे.

या संदर्भात बोलताना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, 'कचरा प्रकल्पात रोज २० मेट्रिक टन कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. प्रकल्पासाठी सुमारे वीस कोटींचा खर्च आहे. या प्रक्रिया केंद्रामधून  कंपन्यांचा कचरा विनामोबदला घेतला गेला, तर समस्या राहणार नाही.'

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे  कार्यकारी अभियंता संजय कोतवड म्हणाले, 'कंपन्यांमधील कचरा संकलित व्हावा व त्याच्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी एमआयडीसी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या वतीने सुमारे सात एकर जागेवर खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत कचरा प्रक्रिया केंद्र उभे राहत आहे. ग्रामपंचायत कंपन्यांकडून कर वसूल करीत असल्याने कचऱ्याचे नियोजन त्यांनी करणे आवश्यक आहे. काही कंपन्या निर्माण झालेला कचरा तेथेच विसर्जित करतात. कचरा विसर्जित करण्यासाठी बाहेर नेण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अघातक कचरा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा', असेही ते म्हणाले.

चाकण हा पुण्यातील मुख्य आणि सर्वांत मोठा औद्योगिक कॉरिडॉर आहे. येथे आयटी हब आहे. यामध्ये मर्सिडीज-बेंझ आणि फोक्सवॅगन यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या परिसरात काही आयटी पार्कदेखील आहेत. तळवडे आयटी पार्क, कोमरझोन, प्लॅटिनम टेक पार्क आणि इंटरनॅशनल टेक पार्क  चाकणजवळ आहेत.  पिंपरी-चिंचवड, भोसरी औद्योगिक परिसरही चाकणपासून फक्त १६ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या भागातील समस्या कायमस्वरूपी सुटणे महत्त्वाचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story