दुचाकीस्वार घसरला, मोडले दोन्ही पाय

शहरातील विकासकामांबरोबरच पावसाळापूर्व विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र पावसाळापूर्व कामे करण्याची मुदत संपल्यानंतरही ही कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. पोलीस आयुक्तालयाजवळील लाल देवळासमोर पालिकेने दुरुस्तीसाठी केलेल्या खोदकामामुळे गुरुवारी एका युवकाचा अपघात झाला असून या अपघातात त्याच्या दोन्ही पाय मोडले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:44 am
दुचाकीस्वार घसरला, मोडले दोन्ही पाय

दुचाकीस्वार घसरला, मोडले दोन्ही पाय

पावसाळापूर्व कामांची मुदत उलटली तरी कामे सुरूच; शहरातील विविध ठिकाणच्या खोदकामामुळे अपघाताची टांगती तलवार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरातील विकासकामांबरोबरच पावसाळापूर्व विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र पावसाळापूर्व कामे करण्याची मुदत संपल्यानंतरही ही कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत. पोलीस आयुक्तालयाजवळील लाल देवळासमोर पालिकेने दुरुस्तीसाठी केलेल्या खोदकामामुळे गुरुवारी एका युवकाचा अपघात झाला असून या अपघातात त्याच्या दोन्ही पाय मोडले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

शहरातील विकासकामे, दुरुस्ती, मेट्रो कामांसाठी विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. हे खोदकाम नागरिकांच्या जिवावर उठत असल्याचे दिसून येत आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी तर होतच आहे. शिवाय लहान-मोठे अपघात होत असून वाहनचालकांना नित्य अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'सीविक मिरर'ने शहरातील धोकादायक खड्ड्यांचा आढावा घेतला.

पावसाळ्यात रस्ते तुंबू नयेत, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते. पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह महापालिका आयुक्तांनी १ जून रोजी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस महापालिका, पोलीस, महामेट्रो, टाटा मेट्रो, पुणे शहर विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ आणि पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते. गटारे आणि नाले सफाईची कामे वेगाने करावीत. रस्त्यातील राडारोडा उचलावा, महापालिकेने राहिलेली पावसाळी कामे वेगाने करावीत, मेट्रोने आपली कामे उरकून घ्यावीत या उद्देशाने विविध विभागांची संयुक्त बैठक बोलावली होती. महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत.

धनकवडीतील निर्मल पार्क सोसायटी समोरील रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर अजूनही रस्ता न केल्याने तेथे खड्डा तयार झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागासमोरील रस्त्याची तीच अवस्था झाली आहे. विकासकामांच्या खड्ड्यावर डांबराचा थर न अंथरल्याने इथे खड्डे तयार झाले आहेत. वारजे येथे पुलाचा भराव कोसळल्याने रस्ता अरुंद झाला आहे. इथे पुरेशी काळजी न घेतल्याने गेल्या पंधरा दिवसांत दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान पोलीस आयुक्तालयाजवळील लाल देवळासमोर खोदलेल्या अशाच एका खड्ड्यामुळे गुरुवारी भीषण अपघात झाला. एका युवकाची दुचाकी ट्रकखाली आल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. बुधवारी (७ जून) दुपारी आणि सायंकाळी या परिसरात खड्ड्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. विकासकामांच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघातांची नोंद शहरात विविध ठिकाणी झाली आहे.

वारजे येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश वांजळे म्हणाले, मुंबई-बंगळुरू महामार्गावर वारज्यातील ढोणे वाडा हॉटेल समोरील नाल्याचा भराव खचला आहे. त्यामुळे येथील तीन पैकी एक लेन बंद आहे. मात्र कामाचे योग्य नियोजन न केल्याने येथे दररोज सायंकाळी तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. येथे गेल्या दहा दिवसांत दोन जणांचा बळी गेला आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीतून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना मंगळवारी (६ जून) एका टेम्पोने दुचाकीला धडक दिली. त्यात २३ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. त्यापूर्वी झालेल्या अपघातात टेम्पो चालकाला प्राण गमवावे लागले होते. या पुलापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरातच दोन्ही अपघात झाले आहेत.  

कर्वेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे म्हणाले, कर्वे रस्ता ते विठ्ठल मंदिर येथील मार्गावर मेट्रोच्या कामासाठी रस्त्यावर पंधरा फूट खोल खड्डा खोदला आहे. हा खड्डा एका बाजूने उघडा असून, त्यात कामगार काम करत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने खड्ड्याच्या दोन्ही बाजूला सावधानतेचा इशारा देणारा फलक लावलेला नाही. पाऊस सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असे दिसत नाही. पावसाळ्यात दृश्यमानता कमी झाल्याने वाहने खड्ड्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने इथे उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा वाहने खड्ड्यात पडून जिवघेणा अपघात होण्याची शक्यता आहे.

कात्रज येथील सामाजिक कार्यकर्ते राजू कदम म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. जड वाहतुकीसह इतर वाहनेही या रस्त्यावर कायम असतात. भू-संपादनाअभावी या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे कधी निमुळता रस्ता आणि अचानक मध्ये येणाऱ्या खड्ड्यांना वाहनचालकांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यातच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर येथील चेंबर ८ दिवसांपूर्वी खचले आहे. त्यामुळे इथे अपघाताची शक्यता आहे. पाऊस झाल्यास तुटलेले चेंबरही दिसणार नाही. त्यामुळे येथील खड्डे बुजवण्याबरोबरच तुटलेले चेंबरही तातडीने दुरुस्त करायला हवे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story