भय अजूनही इथले संपत नाही...

भटक्या श्वानांनी केलेल्या हिंस्त्र हल्याने हादरून गेलेल्या वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत आजही भयाचे वातावरण होते. रहिवासी बुधावारी कामाला जाण्याऐवजी भटक्या श्वानांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत होते. प्रत्येकजण फ्लॅटबाहेर पडताना रक्षणासाठी हातात काठी घेऊन बाहेर पडत होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Feb 2023
  • 12:33 pm
भय अजूनही इथले संपत नाही...

भय अजूनही इथले संपत नाही...

ब्रम्हा सनसिटीत रहिवासी फिरताहेत हाती काठी घेऊन, पािलका प्रथमच ॲॅक्शन मोडमध्ये, ३६ श्वान बाहेर, बाकीचे आतच

गुणवंती परस्ते 

feedback@civicmirror.in

भटक्या श्वानांनी केलेल्या हिंस्त्र हल्याने हादरून गेलेल्या वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटीत आजही भयाचे वातावरण होते. रहिवासी बुधावारी कामाला जाण्याऐवजी भटक्या श्वानांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत होते. प्रत्येकजण फ्लॅटबाहेर पडताना रक्षणासाठी हातात काठी घेऊन बाहेर पडत होता. पुन्हा एकदा अशी हिंस्त्र घटना घडते की काय असे भयाचे सावट सर्वांवर कायम होते.  भय इथले काही संपत नाही, अशी ब्रम्हा सिटीची स्थिती होती. दरम्यान, कालच्या घटनेनंतर पालिकेचे कर्मचारी ॲक्शन मोडमध्ये आले आणि रहिवाशांची मदत घेऊन ३६ भटक्या श्वानांना पकडले. मात्र, सोसायटीत अजूनही भटके श्वान असल्याचे रहिवासी सांगतात. पकडलेले श्वान मुंढवा भागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंगळवारी सांयकाळी ब्रम्हा सनसिटीत कायमस्वरुपी वास्तव्य असलेल्या सहा-सात भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात अनिरुद्ध जोंधळे हा सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्वानांनी पाठलाग करून केलेल्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या नातवाला पाहून हाऊस किपींग करणाऱ्या आजोबांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते तर सोसायटी परिसरात घरकाम करणारी त्याची आई मंजुषा यांनी जखमी पोराला पाहून हंबरडा फोडला होता. सोसायटीतील रहिवासीही या हिंस्त्र हल्ल्याने चांगलेच हादरले होते. खेळत असलेल्या अनिरुद्धवर केलेल्या हल्ल्यानंतर त्याने जोरदार आरोळी ठोकल्यावर सोसायटीतील रहिवाशांनी त्याला कसेबसे वाचवले.

ब्रम्हा सनसिटीला आज भेट दिली तेव्हा  मंगळवारच्या घटनेची दहशत बुधवारीही सोसायटीमध्ये जाणवत होती. श्वानांच्या दहशतीने घाबरलेले रहिवासी रक्षणासाठी सोसायटीच्या आवारात काठी घेऊन फिरत होते. याबाबत के.लक्ष्मी ही रहिवासी महिला म्हणाली की, कालच्या घटनेनंतर आम्ही चांगलेच घाबरलो असून मुलांच्या आणि आमच्या रक्षणासाठी आम्ही काठी घेऊन हिंडतो. आजही भटके श्वान मोठ्या संख्येने सोसायटीत हिंडत आहेत आणि ते केव्हांही हल्ला करतील हे भय आमच्या मनात कायम आहे. आमच्या रक्षणासाठी महापालिकचे कर्मचारी आणि पोलीस आले त्याबद्दल त्यांचे आभार मानावयास हवे. मात्र, एकही भटके श्वान सोसायटीत ठेऊ नये ही आमची मागणी कायम आहे.

सोसायटीतील सीमा ही अन्य रहिवासी म्हणाली की, आमचा प्राण्यांना आणि प्राणीप्रेमींना विरोध नाही. आम्हाला एवढेच म्हणायचे आहे की, प्राणी प्रेमींना सोसायटी बाहेर या श्वानांना खावयास द्यावे. मुलाबाळांनी आवारात मोकळेपणाने आणि सुरक्षित खेळावे आणि अन्य रहिवाशांनाही आवारात फिरताना सुरक्षित वाटले पाहिजे. येथे फ्लॅट घेण्यामागे शांतपणाने आणि सुरक्षितपणे येथे राहता यावे हा आमचा उद्देश होता. मात्र, सोसायटीत भटक्या श्वानांच्या झुंडी मुक्तपणे फिरत असतात. यामुळे भीतीने आम्ही सोसायटीत मोकळेपणाने हिंडू शकत नाही. मुलेही एकटेपणाने सोसायटीत फिरण्यास घाबरतात. कधीही एखाद्या श्वान हल्ला करेल ही भीती कायम असते. गेली दहा वर्षे हिंस्त्र श्वानांच्या प्रश्नांबाबत आम्ही लढा देत आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही श्वानांना पकडण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवतो, तेव्हा प्राणीप्रेमी आमच्या विरोधात हात सरसावून उभे राहतात. श्वानांना सोसायटी बाहेर नेण्यास ते कडाडून विरोध करतात. हे लोक प्राणीप्रेमी नसून कायद्याचा दुरूपयोग करून आमच्यासमोर समस्या निर्माण करतात. जेव्हा मंगळवारसारखी दहशत निर्माण करणारी घटना घडते तेव्हा हे प्राणीप्रेमी काही मदतीला बाहेर येत नाहीत. कड्या लावून फ्लॅटमध्ये दडून बसतात.

स्वप्नील होळकर  याबाबत म्हणाला की, कालच्या हादरवून सोडलेल्या घटनेनंतर कोणत्याही भटक्या श्वानास सोसायटीत राहण्याची आणि खायला घालण्याची परवानगी देऊ नये अशी आमची मागणी आहे. श्वान आणि प्राणीप्रेमींच्या आम्ही विरोधात नाही. मात्र, मानवी हक्कासाठी लढण्याची आमच्यावर वेळ आली आहे.

सरिता गोयला म्हणाल्या की, कालच्या घटनेनंतर सर्वजण खूप घाबरलेले असून येथे सुरक्षित वातावरण असावे. मुले, ज्येष्ठांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. नीतू गुप्ता म्हणतात की, आमचा श्नानांना विरोध नाही. मात्र, एवढ्या मोठ्या सोसायटीत राहताना इतरांचा विचार करावयास हवा. सर्वांत शेवटी मनुष्याचे प्राण महत्त्वाचे आहेत, हे प्राणीप्रेमींनी ओळखले पाहिजे. त्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊ नये, हा हल्ल्यानंतर ज्या संख्येने रहिवासी गोळा झाले त्यावरून ज्येष्ठ नागरिक, मुले-बाळे सोसायटीत सुरक्षित नाही हे लक्षात येते. प्राणीप्रेमी भटक्या श्वानांना सोसायटीतच खाण्यास देण्याबाबत आग्रही असतात. पूनम दास म्हणाल्या की, कालच्या घटनेमुळे आम्ही हादरून गेलो आहोत. आम्ही आज कोणतेही काम केले नाही, अनेकजण ऑफीसला गेले नाही. अनेकांनी रजा टाकल्या. श्वानंना पकडणे काही आमचे काम नाही. भटके श्वान कोठे आहे हे पालिका कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी आज आम्ही मदत करत होतो. सोसायटीतील सारे भयग्रस्त झाले आहेत, मुले आवारात खेळायला जाण्याचे नाव घेत नाहीत. सर्वांच्या मनात हल्ल्याची भीती आहे. राजू हा रहिवासी म्हणाला की, जखमी अनिरुद्धच्या उपचाराला मदत व्हावी यासाठी सोसायटीने काही निधी जमवला असून तो त्याच्या पालकांकडे दिला आहे. अनिरुद्ध एवढा गंभीर जखमी झाला आहे की त्या कुटुंबाला त्याचा उपचार झेपणे अवघड आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story