ज्योतिषाच्या नादाला लागला; सॉफ्टवेअर अभियंताही गंडला

घरावर विघ्न आले आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी करावे लागतील, तसेच शारीरिक दोष दूर करण्यासाठी जादूटोणा करावा लागेल, अशी बतावणी करत शहरातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत धानोरी येथील एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 11 Jul 2023
  • 12:46 pm
ज्योतिषाच्या नादाला लागला;  सॉफ्टवेअर अभियंताही गंडला

ज्योतिषाच्या नादाला लागला; सॉफ्टवेअर अभियंताही गंडला

नातेवाईकाने ज्योतिषाच्या मदतीने २८ लाखांना लुटले; ज्योतिषासह तिघांवर गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

घरावर विघ्न आले आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी करावे लागतील, तसेच शारीरिक दोष दूर करण्यासाठी जादूटोणा करावा लागेल, अशी बतावणी करत शहरातील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला  आहे. याबाबत धानोरी येथील एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ज्योतिषासह तिघांवर नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मूलन व काळी जादू अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी हे धानोरी येथे राहात आहेत. त्यांच्या पत्नीच्या भावाने त्यांना गृहशांतीसाठी जादूटोणा करण्याचा सल्ला दिला. घरातील पिडा आणि शारीरिक दोष यांचे निराकरण करून आनंदी जगण्यासाठी ते करणे गरजेचे असल्याचे सांगत  त्याने ज्योतिषाशी संगनमत केले आणि घरात वेग-वेगळ्या पूजा करण्याच्या नावाखाली फिर्यादीची २८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अभिषेक कुलकर्णी (वय ३५), विजय गोविंद जाधव (वय ३०, रा. इंदापूर), सदाशिव फोडे (वय ३७, रा. इंदापूर) यांच्यावर नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मूलन व काळी जादू अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे.

फिर्यादी हे एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करतात. त्यांच्या घरात काही समस्या जाणवत होत्या. त्यांच्या पत्नीच्या भावाने यासाठी आपल्या ओळखीचा एक ज्योतिषी असल्याचे सांगितले. अभिषेक कुलकर्णी हा हस्तरेषा तज्ञ व ज्योतिष असल्याचे त्याने सांगितले. तो एके दिवशी घरी आला. त्याने फिर्यादीचा हात पाहून घरातील अडचणी दूर करण्यासाठी घरात एक यंत्र बसवावे लागेल, असे सांगितले. फिर्यादीने या यंत्राची किंमत १७ लाख ४६ हजार रुपये असल्याचे सांगितले. विजय गोविंद जाधव हा फिर्यादीच्या पत्नीचा भाऊ आहे.  त्याला याच यंत्राची किंमत २ लाख ८९ हजार रुपये असल्याचे सांगितले. आरोपी अभिषेक कुलकर्णीचा ड्रायव्हर आरोपी सदाशिव फोडे याच्या बँक खात्यावर फिर्यादीने पैसे पाठवले. आरोपी फोडे याने फिर्यादीच्या घरात यंत्र आणून बसवले. त्यानंतर त्याचे विघ्न काही काळ गेल्याचा आभास निर्माण केला.

या प्रकरणानंतर जोतिषी वेळोवेळी त्यांच्या घरातील इतर समस्या सांगत होता. कोरोना प्रतिरोध, पितृदोष, गृहशांती यासाठी धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून पैसे लुटत राहिला. दरम्यान, एके दिवशी अभिषेक कुलकर्णी त्यांच्या घरी आला. त्यांनी तुमचे व भावाचे शारीरिक दोष दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यांच्या घरी पूजा केली. त्यात त्याने कणकेचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांना घरातील दागिने घालण्यास सांगितले. त्यानंतर आता हे पुतळे मठात घेऊन जाणार असून तेथे आठ दिवस पूजा करण्यात येणार असल्याचे सांगितले. दागिन्यांसह पुतळे ते घेऊन गेले. त्यानंतर तो पुन्हा आला नाही. दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यानंतर तुमचे दागिने परत करतो, असे तो सांगत होता. त्यानंतर त्याचा संपर्क होत नव्हता. फिर्यादीच्या पत्नीच्या भावाला विचारले तर त्याने आपल्याला काही माहिती नाही, असे सांगून हात वर केले. शेवटी फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितले. नातेवाईकानेच ज्योतिषाच्या मदतीने २० लाख रुपये तसेच २५ तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story