दाम्पत्याला मारहाण; न्यायालयाच्या आदेशाने महिला वकिलावर गुन्हा

गाडीवरून जात असताना पुढे जाण्यासाठी साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका उपाध्यक्षाला आणि त्याच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एका महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:36 am

दाम्पत्याला मारहाण; न्यायालयाच्या आदेशाने महिला वकिलावर गुन्हा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

गाडीवरून जात असताना पुढे जाण्यासाठी साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका उपाध्यक्षाला आणि त्याच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एका महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महिला वकिलाचा विनयभंग केल्याप्रकरणी याच उपाध्यक्षासह चार जणांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार सेनापती बापट रोडवरील पत्रकारनगर चौकात १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता. 

याबाबत उपाध्यक्षाच्या पत्नीने आता चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या वकील तरुणीला पुढे जाऊ दिले नाही म्हणून तिला राग आला. तिने कारमधील दोघांना शिवीगाळ केली आणि पुढे निघून गेली. काही अंतरावर पुढे सिग्नलजवळ गाडी थांबल्यावर फिर्यादी महिलेने खाली उतरून आरोपीला तू आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला. त्यावर आरोपी महिलेने शिवीगाळ करत मारहाण केली. तिने स्वतःजवळील शस्त्राने फिर्यादीचे गालावर वार करून त्यांना जखमी केले, तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचे पती मध्यस्थी करण्यासाठी आले, तर त्यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत फिर्यादी आणि त्यांचे पती चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर घटनेचा तपास करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वीचा हा प्रकार आहे. त्यावेळी वकील महिलेची विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. परस्परविरोधी तक्रारी न्यायालयातून दाखल केल्या असल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले. 

Share this story