आरटीओच्या ऑनलाईन कारभाराची बत्ती गुल
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपले कामकाज ऑनलाईन केले असले तरी सक्षम संगणक प्रणाली नसल्याने आरटीओच्या कामाचा खोळंबा होत आहे. केवळ गेल्या ११ दिवसांचा विचार केल्यास आरटीओ कार्यालयाला सहा दिवस सुट्ट्या होत्या, तर कामाच्या पाच दिवसांपैकी चार दिवस नेट बंद तरी होते अथवा ते अत्यंत धीम्या गतीने चालत होते. तर, एक दिवस लाईटच गुल असल्याने सर्वच कामकाज ठप्प पडले होते.
आरटीओने सेवा ऑनलाईन केली असली तरी या सेवेला सक्षम संगणकीय प्रणालीची साथ लाभत नाही. इतकेच काय तर वीज गेल्यास त्याला बॅकअपही देण्याची सुविधा नाही. सर्वच काम संगणकावर असेल आणि अशा पद्धतीचे अडथळे वारंवार येत असतील तर मग संगणकीय प्रणालीचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. केवळ गेल्या ११ दिवसांचा विचार केल्यास आरटीओची सेवा जवळपास बंदच असल्याचे दिसून येते.
एप्रिल महिन्यात २९ आणि ३० तारखेला शनिवार आणि रविवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती. तर, सोमवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची शासकीय सुट्टी होती. या काळात काम झाले नाही. २ मे रोजी चार तास वीज नसल्याने कामकाजाचा निम्मा दिवस वाया गेला. ३ मे रोजी पूर्ण दिवस संगणकीय प्रणाली ठप्प होती. ४ मे रोजी पूर्ण दिवस नेट स्लो होते. त्यात संगणकीय प्रणालीतही अडथळे येत होते. त्यानंतर ५ मे रोजी बौद्ध पौर्णिमा, ६ आणि ७ तारखेला शनिवार आणि रविवारची सुट्टी होती. सोमवारी (दि. ८) सकाळी १० ते दुपारी १ या कार्यालयीन वेळेत वीज नसल्याने कामकाज ठप्प होते. वीज आल्यानंतर नेट संथ गतीने सुरू होते. नेट व्यवस्थित चालण्यास सायंकाळी सव्वापाच वाजता सुरुवात झाली. मंगळवारीदेखील (दि. ९) सिस्टीम स्लो असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीओत गेल्या ११ दिवसांत कामकाज जवळपास झालेच नाही.
महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दुग्गल म्हणाले, ‘‘गेल्या ११ दिवसांत सहा शासकीय सुट्ट्या होत्या, तर कामकाजाच्या पाच दिवसांत चार दिवस नेट स्लो होते, तर एक दिवस चार तास वीज नसल्याने कामकाज झाले नाही. महिन्यातील आठ कामाचे दिवस अशा पद्धतीने वाया जात असल्याने साध्या कामासाठीदेखील नागरिकांना दीड-दोन महिने वाट पाहावी लागत आहे.’’
दिनेश शिंदे (नाव बदलले आहे) म्हणाले, ‘‘माझ्या मुलाच्या वाहन परवान्याची प्रक्रिया २३ मार्च २०२३ रोजी पूर्ण झाली. त्यानंतर १५ दिवसांत परवाना मिळणे अपेक्षित होते. मात्र, आजअखेरीस परवाना मिळालेला नाही. मंगळवारी (दि. ९) मला परवाना प्रिंट झाल्याची माहिती समजली.’’