भारनियमनामुळे कामांची 'बत्तीगुल'

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव परिसरासाठी मे महिना 'शॉक' देणारा ठरला आहे. जून महिन्यातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने मागणीप्रमाणे उत्पादने पोहोचवण्यात उद्योजक अपयशी ठरले आहेत. मे महिन्यात तब्बल १२० तास विजेचा खोळंबा झाल्याने काम बंद राहिले. परिणामी मागणीच्या तुलनेत २५ ते ४० टक्के उत्पादन कमी झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:38 am
भारनियमनामुळे कामांची 'बत्तीगुल'

भारनियमनामुळे कामांची 'बत्तीगुल'

पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव एमआयडीसी १२० तास अंधारात; उद्योगांच्या ४० टक्के 'ऑर्डर' अपूर्णच

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव परिसरासाठी मे महिना 'शॉक' देणारा ठरला आहे. जून महिन्यातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने मागणीप्रमाणे उत्पादने पोहोचवण्यात उद्योजक अपयशी ठरले आहेत. मे महिन्यात तब्बल १२० तास विजेचा खोळंबा झाल्याने काम बंद राहिले. परिणामी मागणीच्या तुलनेत २५ ते ४० टक्के उत्पादन कमी झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

गेले काही आठवडे उद्योगनगरीत (एमआयडीसी) वारंवार विजेचा खोळंबा होत आहे. उच्चदाब वाहिनीतील तांत्रिक बिघाड, विजेची मागणी वाढल्याने यंत्रणा कोलमडणे, जुन्या वितरण यंत्रणेमुळे वीज पुरवठ्यात होणाऱ्या अडथळ्यांमुळे सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे महावितरणला नाईलाजाने लोडशेडिंग अथवा चक्राकार पद्धतीने लोडशेडिंग करावे लागत आहे. या खोळंब्यामुळे कामाचे तास वाया जात असून, वेळेत ऑर्डर पोहोचविण्यासाठी कंपन्यांना कसरत करावी लागत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात १३ हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. चाकणमध्ये ३२०० लहान-मोठे युनिट आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणारे सुटे भाग पुरवण्याचे काम या उद्योगातून होते. या शिवाय प्रक्रिया उद्योगासह इतर उद्योगांचे प्लांटही जिल्ह्यात आहेत. या सर्वांना याचा फटका बसत आहे.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे सचिव जयंत कड म्हणाले, 'औद्योगिकनगरीतील वीजपुरवठा वारंवार जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्यात आणखी वाढ झाली. वीजयंत्रणा जुनी झाल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे येतात. संघटनेने मे महिन्यात किती तास वीज गेली याचा आढावा घेतला. त्यात केवळ मे महिन्यातच १०० ते १२० तास वीज गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जून महिन्यातही ही स्थिती कायम आहे. मे महिन्यात जितका वेळ वीज गेली तितका काळ काम ठप्प होते.'

'ऑटोमोबाईल उद्योगाला अनेक लहान पार्ट पुरवण्याचे काम इथे मोठ्या प्रमाणावर चालते. विजेचा खोळंबा झाल्याने मागणीच्या तुलनेत ६० टक्के मालाचा पुरवठा करू शकलो. उदाहरणार्थ ट्रॅक्टर बनविण्यासाठी लागणारे लहान-मोठे पार्ट इथे बनवले जातात. साधारण आठ ते साडेआठ हजार ट्रॅक्टरसाठीच्या स्पेअर पार्ट्सची मागणी होती. केवळ ५ हजार ट्रॅक्टरला लागणारा माल पुरवता आला. अनेक ऑर्डर उशिरा पोहचल्या. महावितरणने एक दिवस ठरवून द्यावा. त्या काळात वीज नसेल असे जाहीर करावे. आम्ही त्या प्रमाणे कामाचे नियोजन करू. मात्र, इतर वेळी चोवीस तास अखंडित वीज पुरवठा राहील याची काळजी महावितरणने घ्यावी', असे कड यांनी सांगितले.   

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, 'उद्योगनगरीतील भोसरी, पिंपरी-चिंचवड, कुदळवाडी, तळवडे, चिखली, शांतीनगर, गुळवे वस्ती, लांडेवाडी या भागात सातत्याने विजेचा खोळंबा होत आहे. या परिसरात किमान चाळीस हॉटस्पॉट आहेत. तिथे कायम वीज जात असते. गेले काही आठवडे दररोज दीड ते तीन तास वीज जाते. त्यामुळे काम ठप्प होते. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम करावा लागतो. त्याचे वेगळे पैसे कामगारांना द्यावे लागतात. इतके करूनही ऑर्डर उशिरा जात आहे. विजेचा लोड कमी-अधिक झाल्याने सीएनसी मशिनला असलेली सेन्सर चिप खराब होण्याचा धोका वाढतो. या चिपची किंमत ५० हजार ते एक लाख रुपये आहे. त्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. उत्पादनातील नुकसान, ओव्हरटाईममुळे वेतनावर करावा लागणारा अधिक खर्च आणि उशिरा जाणाऱ्या ऑर्डर अशा दुष्टच्रकाला उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे.'  

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, 'चाकण परिसरात ऑटोमोबाईल, फार्मा, फार्मास्युटिकल आणि एअर प्रोडक्शन कंपन्यांचे युनिट आहेत. गेल्या महिनाभरापासून सातत्याने विजेचा खोळंबा होत असल्याने काम ठप्प पडत आहे. काम बंद राहिल्याने उत्पादन कमी होते. मागणीनुसार उत्पादन करण्यासाठी ओव्हरटाईम करावा लागतो. त्याचा खर्च उद्योजकांनाच सहन करावा लागतो. वेळेत मालाचा पुरवठा न झाल्यास संबंधित कंपन्या दंड ठोठावतात. तसेच, हातातून काम जाण्याचा धोका असतो. गेल्या महिनाभरात मागणीच्या तुलनेत २५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. विजेच्या खोळंब्यामुळे चाकण परिसरातील उद्योगांना दररोज अडीचशे कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.'

२९ कोटी २१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी

एमआयडीसी विद्युतयंत्रणा सुधार योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडी एमआयडीसीमध्ये २९ कोटी २१ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, ही कामे सध्या सुरू आहेत. या कामामध्ये ३७.४५ किलोमीटर नवीन भूमिगत उच्चदाब फिडर्स (वीजवाहिनी), १५ नवीन वितरण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), ६६ नवीन रिंग मेन युनिट आणि १५५ नवीन फिडर पिलर्स बसवण्यात येत आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये तीन नवीन स्वीचिंग स्टेशन्स, एका स्वीचिंग स्टेशनची क्षमतावाढ, ३५ किलोमीटर नवीन भूमिगत वाहिन्या उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील सुमारे ३२०० औद्योगिक ग्राहकांना आणखी अखंडित वीजपुरवठा होईल, अशी माहिती महावितरणने दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story