पर्सिस्टंट
राहुल शिंदे
rahul.shinde@civicmirror.in
TWEET@rahulsmirror
काही कौटुंबिक कारणांमुळे आयटी क्षेत्रातील नोकरी सोडावी लागलेल्या महिलांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. पर्सिस्टंट सिस्टीमच्या सहकार्याने या महिलांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. महिलांचे रोजगार क्षेत्रातील प्रमाण वाढावे, या उद्देशाने हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
कौशल्य शिक्षणाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राज्यात स्वतंत्र कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीतून पर्सिस्टंट सिस्टीम कंपनी आणि कौशल्य विद्यापीठाने करार करून रोजगारापासून दूर गेलेल्या महिलांना पुन्हा रोजगारक्षम बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाद्वारे पर्सिस्टंट सिस्टीमला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ निर्माण केले जात आहे. राज्यभरातून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. या प्रक्रियेनंतर तीनशेपेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवडक महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. अशाच प्रकारची प्रक्रिया राबवून येत्या एप्रिलमध्ये पुढील तुकडी निवडली जाणार आहे.
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘‘स्त्री-पुरुष समानतेबाबत नियमित चर्चा केली जाते. परंतु, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे रोजगाराचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यात वाढ होण्याची आवश्यकता आहे. या प्रक्रियेत योगदान देण्यासाठी कौशल्य विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.’’
‘‘लग्नानंतर चार ते पाच वर्षे घरी राहिल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होतो. अशा महिलांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काही वेळा अभ्यासक्रम शिकविल्यानंतर चौथ्या पाचव्या वर्षात नोकरीबाबत विचार केला जातो. परिणामी रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. या उपक्रमात असे न करता विद्यापीठातर्फे कंपनीला अपेक्षित असणारा अभ्यासक्रमच शिकवण्यावर भर दिला जात आहे,’’ असेही पालकर यांनी आवर्जून नमूद केले.
पर्सिस्टंट सिस्टीमला आवश्यक असलेले डॉट नेट, जावा यातील कामाचे प्रशिक्षण या महिलांना तज्ञांकडून दिले जात आहे. त्यांना पाच महिन्यांचे प्रशिक्षण आणि एक महिना प्रत्यक्ष कंपनीत कामाचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर या महिलांना थेट कामावर रुजू करून घेतले जाईल.अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यापीठाचा हा पहिलाच सामाजिक उपक्रम आहे.
- डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ