रुग्णालयाच्या आवारात राहत असलेल्या कुटुंबावर टांगती तलवार
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
बिबवेवाडी येथील कामगार राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. यामुळे रुग्णालयाच्या आवारात राहणाऱ्या सुमारे ३० कुटुंबियांना बेघर व्हावे लागणार आहे. यासंदर्भात नोटीसही देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत हे ईएसआयसी रुग्णालय येते. या रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पाच महिन्यांपूर्वी केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी रुग्णालयाला भेटही दिली होती. त्यानंतर सरकारने पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विस्तारीकरणासाठी ४७० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर झाल्याने पुढील एक-दीड महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे समजते. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात राहत असलेल्या कुटुंबावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
कामगार महामंडळाचे कार्यालय आणि रुग्णालयाचा परिसर खूप मोठा आहे. ३५ ते ४० वर्षांपूर्वी या जागेवर झोपड्या उभ्या राहिल्या. सध्या हा भाग प्रेमनगर म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने या भागात सीमाभिंत बांधली. त्यावेळी सुमारे ३० घरे सीमाभिंतच्या आतील बाजूस म्हणजे रुग्णालयाच्या आवारात आली. तेव्हापासून आजपर्यंत ही कुटुंबे तिथेच राहत आहेत. पण विस्तारीकरणाच्या कामासाठी आता त्यांना या जागेतून हटवले जाणार असल्याने संकट उभे ठाकले आहे. महामंडळाने ही घरे बेकायदेशीर आणि अतिक्रमण असल्याचे सांगत नोटीस जारी केल्या आहेत. महामंडळाच्या विभागीय संचालकांसमोर यासंदर्भात सुनावण्याही झाल्या आहेत. तिथेही या कुटुंबांच्या पदरी निराशा आली.
विजय कोटनुरे यांचा जन्म रुग्णालयाच्या आवारातील घरातच झाला आहे. त्यांच्या घरात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि मुलांसह आठ जण राहतात. ते रुग्णालयातच कंत्राटी तत्वावर उद्यानात मजुरीचे काम करतात. त्यांनाही जागा खाली करण्याची नोटीस आली आहे. घर आणि नोकरीही जाणार असल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळणार आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझ्यासारखीच जवळपास ३० कुटुंबे उघड्यावर येणार आहेत. आम्ही ३५-४० वर्षांपासून येथे राहत आहोत. आता अचानक कुठे जाणार? सात-आठ जण रुग्णालयातच काम करतात. येथून गेलो तर नोकरीही जाईल. घरही नाही आणि नोकरीही नाही, अशी स्थिती होईल.’’ आमच्या पुनर्वसनाबाबत शासनाने निर्णय घ्यायला हवा, अशी मागणीही काटनुरे यांनी केली.
जगन्नाथ बसवकेरी हे बिगारी म्हणून तर पत्नी धुणीभांड्याचे काम करतात. तीन लहानग्यांसह हे कुटुंब रुग्णालयाच्या आवारात राहते. ते २० ते २५ वर्षांपासून या जागेत राहतात. जागा रिकामी करण्याबाबत त्यांनाही नोटीस आली आहे. ‘‘आम्ही जायला तयार आहोत, पण त्याआधी आमची पर्याची व्यवस्था करावी. इतर ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहण्याची आमची ऐपत नाही. दुसरीकडे कुठे जाणार, त्याचा थांगपत्ता नाही. सीमाभिंत बांधतानाच आमची पर्याची व्यवस्था केली असती तर आज ही वेळ आली नसती,’’ अशा शब्दांत जगन्नाथ यांनी आपली व्यथा मांडली.
कामगार राज्य विमा महामंडळाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी याबाबत भुपेंद्र यादव यांना पत्र लिहून ३० कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. ‘‘हे नागरिक या जागेवर ४० वर्षांपासून राहत आहेत. आता रुग्णालयाच्या कामासाठी त्यांना जागा रिकामी करण्याच्या सतत नोटीसा दिल्या जात आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीचा विचार करावा,’’ अशी विनंती नांगरे यांनी केली आहे.