Bad luck : दुर्दशम

शहरातील उन्हाचा पारा ४० ते ४४ अशं सेल्सिअसमध्ये फिरत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी खास एसी म्हणून सुरू केलेल्या पुण्यदशम सेवेला अवकळा आली आहे. उन्हाच्या झळा सोसत प्रवाशांना एसी (वातानुकूलित यंत्रणा) बंदचे बोर्ड पाहावे लागत आहे. सध्याच्या पुण्यदशम बसची इंजिन क्षमता एसी चालवण्याची नाही. त्यामुळे एसी सुरू केल्यास बस बंद पडत आहेत. मात्र यावर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) काही उपाययोजना करत नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 15 May 2023
  • 12:11 am
दुर्दशम

दुर्दशम

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरातील उन्हाचा पारा ४० ते ४४ अशं सेल्सिअसमध्ये फिरत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी खास एसी म्हणून सुरू केलेल्या पुण्यदशम सेवेला अवकळा आली आहे. उन्हाच्या झळा सोसत प्रवाशांना एसी (वातानुकूलित यंत्रणा) बंदचे बोर्ड पाहावे लागत आहे. सध्याच्या पुण्यदशम बसची इंजिन क्षमता एसी  चालवण्याची नाही. त्यामुळे एसी सुरू केल्यास बस बंद पडत आहेत. मात्र यावर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) काही उपाययोजना करत नाही. अशा या बसला फिटनेस प्रमाणपत्र देणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागानेही आता आपले हात झटकले आहेत.

पीएमपीने प्रवाशांना दहा रुपयांत ठरावीक मार्गावर कोठेही उतरा, कोठेही चढा अशी सेवा सुरू केली. या बसमध्ये एसी असणार असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, बसमधील एसी कधीच चालू नसतो अशा प्रवाशांच्या तक्रारी आल्या होत्या.  त्याबाबत पीएमपी प्रवासी मंचने पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतरही त्याची दखल घेतली नाही. अखेरीस, पीएमपी प्रवासी मंचचे मानद सचिव संजय शितोळे यांनी याबाबत पीएमपी आणि आरटीओकडे तक्रार केली होती. पीएमपीकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी एसी चालू केल्यानंतर बस बंद पडत आहेत. अशी बस आपण खरेदी करण्यास कशी मान्यता दिली, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ज्या कंपनीद्वारे या बस खरेदी केल्या, त्यांच्यावर गुन्हा 

दाखल करावा. बसमधील एसी चालू होत नाही तोपर्यंत वातानुकूलित सेवा असा संदेश काढून टाकावा अशी मागणीही शितोळे यांनी पीएमपी प्रशासनाकडे केली आहे. 

आरटीओला केलेल्या तक्रारीत आपण पीएमपीच्या बस एसी म्हणून पासिंग करून दिल्या आहेत. या बस एसी चालवण्यास कार्यक्षम नाहीत. याचा अर्थ मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करून या बस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे आपण अशा बसवर कारवाई करावी, अशी मागणी शितोळे यांनी आरटीओकडे केली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना पत्र लिहित शितोळे यांची तक्रार आपल्या विभागाशी संबंधित नाही. त्यामुळे ही तक्रार आपल्याकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, या तक्रारीचे निवारण करून त्याची माहिती शितोळे यांना द्यावी असे नमूद करत आरटीओ प्रशासनाने आपले हात झटकले आहेत.  

पीएमपी प्रवासी मंचचे मानद सचिव संजय शितोळे म्हणाले, बसमधील अथवा एखाद्या वाहनातील एसी चालू ठेवण्यासाठी विशिष्ट क्षमतेचे इंजिन आवश्यक असते. पुण्यदशम बसच्या इंजिनची क्षमता तशी नाही. त्यामुळे एसी चालू केल्यास बस बंद पडते. अशा बसला आरटीओ परवानगी कशी देते. त्यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी हा विषय आमचा नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. आरटीओचे हे कृत्य चुकीचे आहे. पीएमपीने अशा बस ताफ्यात कशा घेतल्या, असा प्रश्न आहे. त्यांनी एसी बस अशी जाहिरात केली होती. त्यानंतरही एसी बंद ठेवणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक आहे. या प्रकरणी आपले सरकार या पोर्टलवर तक्रार करणार आहे. यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास या कारभाराची ऑनलाईन तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली जाईल.    

पीएमपीचे मुख्य अभियंता रमेश चव्हाण म्हणाले, पीएमपीच्या ताफ्यात ५० पुण्यदशम बस आहेत. मात्र, या बसची इंजिन क्षमता अवघी ११० हॉर्सपॉवर आहे. एसी बस चालवण्यासाठी इंजिनची क्षमता किमान १३० हॉर्सपॉवर आवश्यक असते. १४० हॉर्सपॉवर इंजिन क्षमता असलेले वाहन एसी सुविधेसाठी अधिक उपयुक्त ठरते. या बसचा एसी केवळ २४ प्रवासी क्षमतेनुसार डिझाईन केला आहे. नियमानुसार  प्रवासी क्षमतेच्या ४० टक्के प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. म्हणजे बसमध्ये जास्तीत जास्त ३३ प्रवासी प्रवास करू शकतात. ही बस प्रामुख्याने पेठांमधून प्रवास करते. त्यामुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असते. प्रवासीही अनेकदा खिडक्या उघडतात. या कारणामुळे इंजिनावर ताण येऊन बस बंद पडते. सध्या एकूण बसची संख्या कमी असल्याने एसी बंद ठेवून पुण्यदशम बस चालवल्या जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story