अवेळी खोदल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला
महेंद्र कोल्हे
feedback@civicmirror.in
TWEET@mahendrakmirror
कोणत्या वेळेला कोणते काम करावे याचे साधे भानही न ठेवल्यास काय अवस्था होते याचा प्रत्यय कात्रज, आंबेगाव, दत्तनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी घेतला. शाळेला आणि कामाला बाहेर जाण्याच्या वेळेसच एक रस्ता पूर्णपणे बंद करून विकास काम सुरू होते. त्या विकास कामाने वाट बंद केल्याने हतबल झालेले नागरिक बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधत होते. रस्ते खोदण्यासाठी रात्रीची परवानगी असतानाही सकाळी रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
शुक्रवारची सकाळ भारती विद्यापीठ आणि परिसरातील नागरिकांसाठी प्रचंड तापदायक ठरली. निमित्त झाले भारती विद्यापीठ येथून कात्रज येथील महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक सुरू केलेले खोदकाम. त्यामुळे राजमाता जिजाऊ भुयारी मार्गाकडून येणारी आणि जाणारी वाहतूक ठप्प पडली. या परिसरात भारती विद्यापीठ, सरहद, पोदार आणि इतर काही महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली. मुलांना घेऊन पायी चालणे देखील अवघड झाले होते. सकाळी कार्यालयात पोहोचण्याची घाई असल्याने चाकरमान्यांची गडबड सुरू होती.
खोदाई सुरू असताना पोलिसांनी वाहतूक वळवण्यासाठी महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर बॅरिकेड्स लावले. मात्र, वाहनचालकांची संख्याच प्रचंड असल्यामुळे वाहतूक नियमन करणे जवळपास अशक्य झाले होते. त्यातच संयम सुटलेले नागरिक मिळेल तिथून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होते. काहीजण एकेरी मार्गाच्या विरुद्ध दिशेने मार्ग काढताना दिसत होते, तर काहीजण धोकादायक पद्धतीने दुभाजकावरून वाहने दुसरीकडे नेतानाही दिसत होते. परिणामी वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याऐवजी वाहतुकीचा गुंता आणखी घट्ट होत होता. त्यामुळे कात्रज येथील बाह्यवळण मार्ग आणि भारती विद्यापीठ, कात्रज, आंबेगाव आणि धनकवडीकडे जाणाऱ्या लगतच्या रस्त्यांवरही त्याचा ताण पडला. अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर रात्री अथवा वाहतूक कमी असताना काम करायचे सोडून सकाळची वेळ का निवडली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे महानगरपालिकेचे उप अभियंता विजय वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठिकाणी महापालिकेने खोदाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. हे काम रस्ते महामार्ग विभागाचे असल्याची शक्यता आहे. मी ही या वाहतूक कोंडीत अडकलो असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.