औंध जिल्हा रुग्णालयाचं ‘आभाळ फाटलं’

औंध जिल्हा रुग्णालयातील महिलांचे स्वच्छतागृह आणि वाॅर्डची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतागृहातील छताला तर तडे गेले आहेत. यामुळे महिला रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Indu Bhagat
  • Sat, 8 Jul 2023
  • 10:09 am
औंध जिल्हा रुग्णालयाचं ‘आभाळ फाटलं’

औंध जिल्हा रुग्णालयाचं ‘आभाळ फाटलं’

विविध वॉर्ड तसेच महिलांच्या स्वच्छतागृहातील धोकादायक छतामुळे रुग्णांचा जीव टांगणीला

इंदू भगत

feedback@civicmirror.in

औंध जिल्हा रुग्णालयातील महिलांचे स्वच्छतागृह आणि वाॅर्डची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतागृहातील छताला तर तडे गेले आहेत. यामुळे महिला रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नैसर्गिक विधीसाठी जाताना महिला रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या  मनात छत कोसळणार तर नाही ना, ही भीती कायम असते. स्वच्छतागृहाच्या भिंतींची अवस्थादेखील वाईट आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी वाहात असल्याने पायऱ्यांजवळील ठिकाणासह अनेक भाग निसरडे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयात अशी परिस्थिती आहे. मात्र असे असूनही ही इमारत व्यवस्थित असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

मागील वर्षी औंध जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्या ऑडिटमधील अहवालाच्या आधारे ही इमारत चांगली असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे, याच स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये महिलांचे स्वच्छतागृह असलेल्या भागाची अवस्था भयंकर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छतागृहातील छताचे प्लास्टर एका महिलेच्या डोक्यावर पडतापडता थोडक्यात वाचले. असा जीवघेणा प्रकार घडूनही इमारत व्यवस्थित असल्याच्या रुग्णालय प्रशाासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या शरद शेट्टी यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. ते म्हणाले, ‘‘ही काही नवी समस्या नाही. महिला स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीदेखील आम्ही रुग्णालय प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. अलीकडेच, छताचे प्लास्टर एका महिलेच्या डोक्यावर पडण्यापासून थोडक्यात वाचले. ही घटना त्या महिलेच्या जिवावर बेतू शकली असती. व्यवस्थापनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.’’ प्रत्येक रुग्णालयात रुग्णाच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व  दिले जाते. मात्र, औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याकडे केलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे, असेही शेट्टी यांनी नमूद केले.

‘मिरर’ने केलेल्या पाहणीतदेखील शेट्टी यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे आढळून आले. रुग्णालयातील महिलांच्या स्वच्छतागृहाच्या छताला अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही दिसले. कुबटपणा आणि स्वच्छतेचा अभाव सहज लक्षात येणारा आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाला यात काहीही वावगे वाटत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात संपर्क साधला असता सहायक रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे म्हणाल्या, ‘‘महिला स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे. आम्ही त्याबाबत चिंतित आहोत. त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत ती करण्यात येईल. रुग्णालयाच्या स्वच्छता विभागात ४० ते ५० जागा रिक्त आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाची स्वच्छता नीट ठेवली जात नाही. छताची अवस्था चांगली नाही, हेही आम्हाला मान्य आहे. ही इमारत जुनी आहे. मागील वर्षी आम्ही याचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यात ही इमारत वापरासाठी फिट असल्याचे सांगण्यात आले. तो अहवालदेखील आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला आहे. त्याचबरोबर, स्वच्छतागृहातील समस्या तातडीने दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास त्यांनी सांगितले आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story