रोहित पवारांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
देवेंद्र शिरुरकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचे हडपसर येथील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचं सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ केली.
आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली. सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला, याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
रोहित पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादी सोडून गेलेल्या दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेत्यांवर समाज माध्यमातून साहेबांनी एवढे काही दिल्यानंतरही असा निर्णय घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावरही आमदार रोहित पवार यांनी टीका केली. यावर भुजबळ यांनी रोहित पवारांचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळेस मी मुंबईचा महापौर होतो, असे म्हणत जास्त बोलाल तर तुमच्या मतदारसंघत येऊन जाहीर सभा घेईन असा इशारा दिला होता.
रोहित पवार राष्ट्रवादी कर्जत- जामखेडचे आमदार आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच कर्जत या आपल्या मतदारसंघात भेट दिली होती. अजित पवारांनी बंड केल्यानंतर रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतल्याने हा धक्कादायक प्रकार घडला का? अशी चर्चा सुरु आहे. घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (१५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. धारदार शस्त्राने वार केल्याने अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.