पावसाचे पुण्यात 'आस्ते कदम'
देवेंद्र शिरूरकर
devendra.shirurkar@civicmirror.in
पुण्यात मॉन्सून दाखल होऊन सोमवारी (२४ जुलै) बरोबर एक महिना होत आहे. मात्र, अजूनही मॉन्सूनचे प्रगती पुस्तक कोरेच असून, तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची तूट आहे. रोजच ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि चिखलाच्या चिडचिडीमुळे पुणेकर आता हैराण झाले आहेत. त्यामुळे एकदाचा जोरदार पाऊस पडून नदी दुथडी भरून वाहावी, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.
जून महिन्याच्या २४ तारखेला पुण्यासह राज्यभरात मॉन्सून दाखल झाला अन् अल्पावधीतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुण्यात पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केली, अगदी जुलैच्या पहिल्या दिवसापर्यंत पावसाचा जोर कायम होता. म्हणजे एक जुलैला पडलेला २०.४ मिलिमीटरचा पाऊस ही यंदाच्या मोसमातील आजवरची सर्वोच्च नोंद आहे. त्यानंतर मात्र, शहरात एकदाही मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली नाही. रविवारपर्यंत शहरात सरासरी २७६.६ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, फक्त १७०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अजूनही १०५.८ मिलिमीटर पावसाची तूट कायम आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा शहरात पावसाचा जोर वाढेल अन् जोरदार पावसाची पुणेकरांची प्रतीक्षा संपेल, असा आशावाद आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दक्षिण कोकण गोवा आणि कोल्हापूरच्या घाट क्षेत्रासाठी सतर्क संस्थेच्या वतीने अलर्ट देण्यात आलेला असून मोठा पाऊस सुरू असताना घाट रस्त्यांनी प्रवास टाळावा, धबधब्यांच्या ठिकाणी थांबू नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात मागील आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात काहीशी वाढ झाली असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत ५२ टक्के, तर १५.१६टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पाऊस अजूनही सुरू झालेला नाही, तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात मिळून गतवर्षी आजच्या तारखेला ६९.१९ टक्के, तर २०.१७ टीएमसी पाणीसाठा जमा होता. यंदा आजच्या तारखेला ५२ टक्के, तर १५.१६ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.