आळंंदी मंदिरात प्रवेश देण्यासाठी स्थानिक वारकरी आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला
राहुल देशमुख
टाळ-मृदंगाचा ताल आणि विठू नामाचा गजर करत आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक आळंदी आणि देहूत दाखल झाले आहेत. आळंदीतील मंदिरात प्रवेश करण्यावरून रविवारी (दि. ११) झालेल्या गोंधळात पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. या वर्षीच्या आषाढी वारीला सुरुवात होण्यापूर्वीच सोहळ्याला गालबोट लागले आहे. या घटनेचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कृतीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
मंदिरात प्रवेशासाठी संख्येची मर्यादा घातल्याने उडालेल्या गोंधळातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सहभागी होणाऱ्या दिंडीतील ७५ वारकऱ्यांना आणि पालखीला खांदा देणाऱ्या ५० आळंदीकरांना मंदिरात प्रवेश देता येईल असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले होते. मंदिरात गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी सारख्या घटनांना निमंत्रण मिळू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने निवडक व्यक्तींना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रविवारी अनेक वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी झालेली होती. मंदिरात प्रवेश करण्यासाठी उसळलेल्या या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.
झालेल्या या घटनेचा व्हीडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
गेल्या वर्षी प्रस्थानाच्या वेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे या वर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी निवडक वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. त्यांनी तशी विनंती दिंडी मालकांना आणि फडकऱ्यांना केली होती. मात्र, त्यानंतरही वारकऱ्यांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. काही जण आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. मंदिरात जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वारकऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काठी उगारली. या सौम्य लाठीमाराचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला.
लाखोंच्या संख्येने राज्यभरातून वारकरी देहू-आळंदीत आले आहेत. त्यातच वारकऱ्यांवर लाठीमार होणे पूर्ण अयोग्य असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा अनेकांनी निषेध केला आहे. पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे म्हणाले, ‘‘यंदा प्रस्थानाला उशीर होऊ नये यासाठी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या ७५ इतकीच मर्यादित केली. खांदेकरी सव्वाशे, तर सोशल मीडिया पत्रकारांनाही मज्जाव केला आहे. केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी नैवेद्याच्या वेळी दर्शन बंद केले जाईल.
असा झाला उद्रेक...
आळंदीतील मंदिरात यंदा ७५ दिंड्यांना प्रवेश देण्यात आला होता. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. आळंदीतील मुख्य मंदिराजवळ असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेला यंदा मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. दरवर्षी आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जातो. यंदा का नाही, असा सवाल संस्थेतील तरुणांनी उपस्थित केला. मंदिराबाहेर लावलेल्या बॅरिकेडजवळ या संस्थेतील शेकडो वारकरी जमा झाले. त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आत सोडण्याची विनंती केली. पोलिसांनी आम्हाला तसे आदेश नसल्याचे सांगत आतमध्ये सोडण्यास नकार दिला. सुमारे अर्धा तास पोलीस आणि त्यांच्यात मंदिरात सोडण्यावरून शाब्दिक देवाण-घेवाण सुरू होती. पोलीस आत सोडत नसल्याने गर्दीचा रेटा सुरू झाला. यात बॅरिकेड खाली पडले. शेकडो जणांचा जमाव मंदिरात जाण्यासाठी पुढे आला. मोठी गर्दी पाहून तिला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी उगारली. अनेकांना लाठीचा प्रसाद खावा लागला. यात तीन जण जखमी झाले. सौम्य लाठी हल्ल्यानंतर उडालेल्या गोंधळात अनेक वारकरी रस्त्यावर पडले. माउलींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वीच हा प्रकार घडला. अचानक शेकडोजण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडे दुसरा पर्याय नसल्याची प्रतिक्रिया बंदोबस्तातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सीविक मिररच्या छायाचित्रकाराकडे व्यक्त केली. मात्र,
मोठ्या प्रमाणावर लाठी हल्ला झाल्याचा त्यांनी इन्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र आजवर जे कधी घडले नव्हते ते यंदाच्या वारीत घडले. यंदा वारकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणुकीतून देशाला दिशा दाखवण्याचे काम वारकऱ्यांनी केले आहे. त्यांच्यावर लाठी हल्ल्याचा प्रकार घडणे संतापजनक आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, "आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली आहे. पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे या वर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत ३ वेळा बैठका घेऊन गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडीत प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदारसुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.