नशेसाठी काहीही...

एक सराईत गुन्हेगार पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वारजे परिसरातील पाच घरफोड्यांचा छडा लागला आहे. रोहित वसंत पासलकर (वय 32, रा. रायकर मळा, धायरी) असे सराइताचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 16 Jul 2023
  • 11:45 pm
नशेसाठी काहीही...

नशेसाठी काहीही...

एक करायचा कटर वापरून वाटमारी तर दुसरा करायचा थेट लाखोंची घरफोडी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला व्यक्ती काहीही करू शकतो, हे सिद्ध करणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. नशा करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही, तर नशेसाठी धारदार शास्त्राचा वापर करून पादचाऱ्यांना लुबाडणाऱ्या एका आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.  नशेसाठी घरफोडी करणारा आरोपी गुन्हे शाखा युनिट-३ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.  त्याने वारजे माळवाडी परिसरातील २० हुन अधिक गुन्हे केले आहेत. त्यातील अनेक गुन्हे घरफोडीचे असल्याचे उघडकीस आले आहे. बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने, चांदी, पैसे मौल्यवान वस्तू घेऊन तो पसार होत असे. लुटीचे पैसे मद्यपान, नशा करण्यासाठी वापरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

एक सराईत गुन्हेगार पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वारजे परिसरातील पाच घरफोड्यांचा छडा लागला आहे. रोहित वसंत पासलकर (वय 32, रा. रायकर मळा, धायरी) असे सराइताचे नाव आहे. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने, मोबाईल असा २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पासलकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दुखापत अशा तब्बल २० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. घरफोडी करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही, याची काळजी घेत असल्याने त्याच्या चोऱ्या पचत होत्या.

सराईत गुन्हेगार पासलकर घरफोड्या करून मिळवलेल्या पैशांची उधळपट्टी करत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने चैतन्य चौक, वारजे येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल हॅन्डसेट, सोन्याचा हार, जोडवे, बदाम, झुमके असे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत. चौकशीत त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, राहुल पवार यांच्या पथकाने केली. तर दुसऱ्या एका घटनेत स्वतः सह मित्रांची नशेची गरज भागवण्यासाठी पादचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. विनायक गणेश कापडे असे त्याचे नाव आहे. कापडे हा शिवाजीनगर परिसरातील पादचाऱ्यांना अडवून, धारदार शस्त्राचा धाक दाखवून नागरिकांकडून पैसे, मोबाईल काढून घेत होता. लुटीतून मिळालेला पैसा व्यसनांसाठी वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कापडेने लुबाडलेले पादचारी शरद प्रकाश घंटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल भारतीय दंड विधान कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादी शरद प्रकाश घंटे (वय- ३५)  मागच्या १५ दिवसांपासून पुणे शहरात कामानिमित्त आले आहेत. ८ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता ते स्वारगेट येथून शिवाजीनगरला जात होते. रात्रीच्या वेळी बस मिळत नसल्याने चालत जात होते. चालून थकल्यामुळे ते शिवाजी पुतळा चौकातील निर्मला अँटामोबाईल दुकानाच्या समोरील पदपथावर विश्रांतीसाठी काही काळ थांबले होते. रात्री १ च्या सुमारास दोन अनोळखी मुले पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून त्यांच्याजवळ जवळ आले. त्यांनी धारदार लोखंडी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, पाकीट जबरदस्तीने काढून घेत शिवीगाळ केली. घटनेनंतर घंटे यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ शोध मोहिमेला सुरवात केली.  

पोलिसांनी घंटे यांच्या फिर्यादीनुसार घटनास्थळी भेट दिली. त्या मार्गावरील १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून पोलिसांनी एका बालकास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन त्याच्या साथीदारांची संपूर्ण माहिती मिळवली. १४ जुलै रोजी कापडे हा  दळवी हॉस्पीटल येथे थांबला असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता विनायक गणेश कापडे (वय २१ रा. एसआरए बिल्डींग ई/७०१ युमनानगर विमाननगर) त्याचा साथीदार आरोपी मंगेश काकडे आणि एक अल्पवयीन बालक यांच्या मदतीने त्यांनी हा गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे, अर्जुन नाईकवाडे यांच्यासह तपास पथकाने ही कामगिरी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story