आणखी एका ‘मेजर’ची ‘४२० गिरी’ उघडकीस

आपण लष्करात मेजर असल्याची बतावणी करत महिलांची फसवणूक, बलात्कार करणाऱ्या आणि लष्करात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने एका पोलीस महिलेस विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून दिले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:30 am
आणखी एका ‘मेजर’ची ‘४२० गिरी’ उघडकीस

आणखी एका ‘मेजर’ची ‘४२० गिरी’ उघडकीस

तरुणींना विवाह, तर तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडवले

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आपण लष्करात मेजर असल्याची बतावणी करत महिलांची फसवणूक, बलात्कार करणाऱ्या आणि लष्करात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने एका पोलीस महिलेस विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून दिले आहे. मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करत ९ तरुणांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून एकूण २८ लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार सदर्न कमांड परिसरातील एका तोतयाबाबत उघडकीस आला होता.

भारतीय सैन्यदलात भरती होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. अशा तरुणांना हेरून आरोपी त्यांच्याकडून पैसे उकळवत असे. त्याने आतापर्यंत १० जणांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, धुळे, औरंगाबाद, सातारा येथील तरुण फसले आहेत. याबाबत कोंढवा पोलिसांनी प्रमोद भीमराव यादव (वय २७, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद लष्कराचा गणवेश घालून लोकांना आपण लष्करात असल्याचे सांगत होता. त्यातूनच आर्मीमध्ये भरती करतो, असे आमिष दाखवित होता. मात्र, एक वर्षाहून अधिक काळ झाला, तरी भरती न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

आरोपी प्रमोदचे वडील व आजोबा सैन्यात होते. त्याचेही सैन्यात भरती व्हायचे स्वप्न होते. सात-आठ वर्षे प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेरीस त्याने घरच्यांना भरती झाल्याचे खोटे सांगितले आणि लष्कराचा गणवेश घालून तो घरातून पुण्याला यायचा. येथे एका खासगी कंपनीत २० हजार रुपये महिना पगारावर काम करत होता आणि लष्करी गणवेशातील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकत होता. त्यातच त्याने एका महिला पोलिसाला आपण लष्करात असल्याची बतावणी केली व लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला सोडून दिले. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान घडला. दरम्यान, त्याने या महिलेच्या नातेवाईक व मुलांना लष्करात भरती करतो, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून १६ लाख रुपये आणि ८ तोळे सोने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने तक्रार दाखल केली.

आरोपी यादव इन्स्टाग्रामवर गणवेशातील फोटो टाकत होता. त्या माध्यमातून तो तरुणांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवत होता. हे तरुण ट्रक चालवून, सुरक्षारक्षकाचे काम करून त्याला पैसे देत होते. तसेच आरोपी महिलांनाही खोटे सांगून आकर्षित करत होता. तो चार-पाच मुलींच्या संपर्कात असून, त्यातील तीन मुली या पोलीस आहेत. त्यातील एका महिलेने त्याच्याविरुद्ध ८ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्याच्या पंधरा दिवस अगोदरच त्याने एका मुलीला लष्करात असल्याचे सांगत तिच्याशी लग्न केले. तीही त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्याने फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे पोलीस तपासात उघडकीस येत असून, त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस ठाण्यातील साहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story