गणेश विसर्जनासाठीचे कृत्रिम हौद बनले डास पैदास केंद्र
प्रिन्स चौधरी
दरवर्षी गणेशमूर्तीचे विसर्जन संपल्यानंतर बांधलेल्या या कृत्रिम हौदांची देखभाल करणे आवश्यक आहे. त्याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. नदीपात्राजवळील बंडगार्डन परिसरात तीन विसर्जन हौद आहेत. तसेच एसएम जोशी पुलाखाली चार आणि ओंकारेश्वर मंदिरासमोर आणखी चार हौद आहेत. हे हौद दरवर्षी विसर्जन प्रक्रियेसाठी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका हे काम विसरल्याने हे हौद आता संसर्गजन्य रोगांचे माहेर बनले आहेत.
येरवड्याचे रहिवासी मनीष दिवेकर ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, "हौदांची अवस्था दयनीय असून त्यामध्ये घाण आणि कचरा टाकला जात आहे. साचलेल्या पाण्यामुळे असह्य दुर्गंधी निर्माण होत आहेच. शिवाय त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांमध्ये आजार पसरत आहेत. देवतांच्या मूर्तींचे विसर्जन केलेल्या कुंडाची इतकी दयनीय अवस्था पाहून फार वाईट वाटते. "
या संदर्भात विचारले असता, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत म्हणाल्या की, “विसर्जन हौदांची स्वच्छता आणि देखभाल ही संबंधित प्रभाग कार्यालयाची जबाबदारी आहे. पावसाळा सुरू असल्याने डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी हौदांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. आम्ही या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."
“वॉर्ड ऑफिसने स्वच्छता मानकांचे पालन केले पाहिजे . स्थानिक आरोग्य निरीक्षकांची ही जबाबदारी आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि रोग नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी आणि फॉगिंगचे व्यवस्थापन वेगवेगळ्या विभागाद्वारे केले जाते. जबाबदारी कोणाची असली तरी काम झालेच पाहिजे.”
दरवर्षी गणपती उत्सवादरम्यान, मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या हजारो मूर्तींचे शहरातील नद्या आणि इतर हौदांमध्ये विसर्जन केले जाते. त्यामुळे जलस्रोत गाळाने प्रदूषित होतात. त्याचा जलचरांवर घातक परिणाम होतो. नद्या प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी पालिकेने पुण्यातील विविध ठिकाणी, काही नदीच्या पात्राजवळ सुमारे ४५ काँक्रीट आणि ३५० हून अधिक स्टीलच्या टाक्या बांधल्या आहेत. मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे हा त्यामागचा उद्देश असला तरी बेफिकीर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मूळ हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.