पर्यायी रस्त्याचा निर्णय, गेट मात्र बंद
राहुल देशमुख / अनन्या कट्टी
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे त्यातच असलेल्या अवजड वाहतुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध आणि शिवाजीनगर मार्गावर वाहतूक कोंडी ही रोजचीच बाब झाली आहे. यावर उतारा म्हणून पुणे महानगर प्रदेश विभाग प्राधिकरणाने, वाहतूक पोलीस आणि पुणे महापालिकेच्या सल्ल्याने चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनला लागून असलेले गेट उघडून पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पर्यायी रस्त्याने शिवाजीनगरला जाण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला. मात्र, पोलीस स्टेशनचे गेट अचानक बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.
या पर्यायी रस्त्याचे गेट खुले ठेवण्याचे आदेश असतानाही ते अचानक बंद करण्यात आल्याने मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला. मुख्य रस्त्यावर दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे केवळ दहा मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी वाहनांना एक तासाचा वेळ लागत आहे. या संदर्भात विचारले असता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘हा रस्ता प्रवाशांसाठी वापरण्यासाठी देण्यात आल्याची मला माहिती नाही. त्यामुळे तो का बंद करण्यात आला यावर मी भाष्य करू शकत नाही. आम्ही या आधीही हा रस्ता वापरण्यासाठी दिला होता. आम्ही पालिकेकडून पत्रव्यवहाराची वाट पाहात आहोत.’’
‘‘विद्यापीठ परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता पर्यायी रस्ता निश्चित केला आहे. पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची पीएमआरडीएची भूमिका होती. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही केली आहे. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हे एक संवेदनशील ठिकाण आहे. जी-२० इव्हेंटसाठीही हा रस्ता वापरला गेला आहे. आता गेट का बंद केले गेले, हे मला माहीत नाही, परंतु तेथे पीएमआरडीए, पालिका आणि विद्यापीठ प्रशासनात यावरून मतभेद नक्कीच नाहीत,’’ असा दावा पीएमआरडीएचे शहर अभियंता विवेक खरवडकर यांनी केला.
चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ‘सीविक मिरर’ने चर्चा केली असता एका अधिकाऱ्याने सांगितले की, "हा रस्ता वाहनांसाठी खुला केलेला असला तरी विद्यापीठ आणि महापालिका यांच्यात मतभेद आहेत.’’
महापालिकेच्या रस्ता विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘वाहतूक वळवण्यासंदर्भातील निर्णय आमचा असला आणि असा फलक आम्ही लावला असला तरी, रस्ता खुला करण्यासंदर्भातील निर्णय सर्वस्वी विद्यापीठ आणि पोलिसांचा आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.’’