धोकादायक 'स्पॉट' देणार 'अलर्ट'

शहरामध्ये उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार हे. 'सी-डॅक'च्या मदतीने शहर परिसरात पडणाऱ्या पावसाचा आणि त्यामुळे जमा होणाऱ्या पाण्याचा 'अलर्ट' देण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील पाणी साचणाऱ्या १४९ ठिकाणांवर पाण्याचा निचारा होण्यासाठी कामे केली जाणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 15 Jun 2023
  • 11:49 pm
धोकादायक 'स्पॉट' देणार 'अलर्ट'

धोकादायक 'स्पॉट' देणार 'अलर्ट'

पुण्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा होणार सज्ज; केंद्राकडून २५० कोटींचा निधी जाहीर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरामध्ये उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार हे. 'सी-डॅक'च्या मदतीने शहर परिसरात पडणाऱ्या पावसाचा आणि त्यामुळे जमा होणाऱ्या पाण्याचा 'अलर्ट' देण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. शहरातील पाणी साचणाऱ्या १४९ ठिकाणांवर पाण्याचा निचारा होण्यासाठी कामे केली जाणार आहेत. आवश्यक तिथे नाला सरळीकरण, खोलीकरण आणि काठाला सीमाभिंत बांधण्याची कामेही केली जातील. त्यासाठी केंद्र सरकार टप्प्या-टप्प्याने पुणे महापालिकेला अडीचशे कोटी रुपये देणार आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात शहरांतील पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच केली होती. या योजनेअंतर्गत पुणे शहराला २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने अडीचशे कोटी रुपये मिळतील, अशी माहिती पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. एप्रिल महिन्यात पुण्यातील पूरस्थितीबाबतचे सादरीकरण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीसमोर झाले होते. त्यात शहरातील १४९ 'ब्लॅक स्पॉट'ची माहिती देण्यात आली होती.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील म्हणाले, पुणे शहरासाठी आपत्ती निवारण कामांसाठी अडीचशे कोटी रुपये मिळतील. त्या अंतर्गत कलव्हर्ट, पावसाचे पाणी वाहून नेण्याची यंत्रणा उभारणे, नाले सरळीकरण, खोलीकरण, टेकडीवरून वाहून येणारे पाणी वळवणे अशा स्वरूपाची कामे केली जातील. त्याचबरोबर हवामान अंदाज अचूक मिळावा यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

मलनिःस्सारण देखभाल व दुरुस्ती विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर म्हणाले, 'आपत्ती निवारणाची कामे करण्यासाठी शहरातील १४९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. इथे पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय पावसाच्या पाण्याचा धोकाही अधिक असतो. उदाहरणार्थ शहरातील विमाननगर येथील फिनिक्स मॉल समोर पाणी साचते. तिथे कलव्हर्ट उभारण्यात येईल. कोथरूडमधील शास्त्रीनगरमध्ये देखील कल्व्हर्ट उभारावे लागेल. सी-डॅकच्या मदतीने धरण पाणलोटक्षेत्र आणि उर्वरीत भागात पडणाऱ्या पावसाची माहिती उपलब्ध होईल. या पावसामुळे किती पाणी ओढे-नाले आणि नदीत येईल. तसेच, धरणातून पाणी सोडल्यास एकत्रित परिणाम काय होईल, याची माहिती उपलब्ध होईल. त्यावरून पुणेकरांना धोक्याची सूचना देणे शक्य होणार आहे.'

निधीअंतर्गत होणारी कामे

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील विद्युतनगर, येरवड्यातील खेसे पार्क, कोथरूडमधील सोबा गार्डन ते जिजाऊनगर इथे तुंबणाऱ्या पाण्यावर उपाययोजना केल्या जातील. जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचू नये म्हणून १६०० एमएम व्यासाची पाईपलाईन नदीपर्यंत टाकली जाईल. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पूल, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भारती विद्यापीठ येथील राजमाता जिजाऊ भुयारी मार्ग, कोंढव्यातील येवलेवाडी ते जगदंबा भवन, हडपसरमधील बनकर शाळा-गोंधळेनगर, दगडूशेठ मंदिर परिसर, नानापेठ पोलीस चौकी, सेव्हन लव्हज चौकात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. बिबवेवाडीतील महेश सोसायटी चौकात डोंगरावरून येणारे पाणी साचून राहते. त्यावरही उपाययोजना करण्यात येणार आहेत. जवळपास ४४ कल्व्हर्ट तयार करणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story