अखेर ‘पाकिस्तानी’ नावाचा शिक्का पुसला

हजारो किलोमीटरचा प्रवास करून २५-२६ वर्षे पुण्यात राहणाऱ्या आणि नागरिकत्वासाठी संघर्ष करणाऱ्या २२ सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले नागरिक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना नुकतेच भारतीयत्व प्रदान करण्यात आले. सतत पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना ते आता ‘आम्हीही भारतीय आहोत,’ असे अभिमानाने सांगू शकणार आहेत. यापूर्वी १२० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.

तब्बल २५-२६ वर्षांनंतर प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकत्व िमळाल्यामुळे आनंद व्यक्त करताना मूळ पाकिस्तानचे सिंधी बांधव.

नागरिकत्वासाठी २५ वर्षे संघर्ष करणाऱ्या २२ सिंधी बांधवांना मिळाली ‘भारतीय’ म्हणून ओळख

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

 

हजारो किलोमीटरचा प्रवास करून २५-२६ वर्षे पुण्यात राहणाऱ्या आणि नागरिकत्वासाठी संघर्ष करणाऱ्या २२ सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले नागरिक म्हणून स्वीकारले आहे. त्यांना नुकतेच भारतीयत्व प्रदान करण्यात आले. सतत पाकिस्तानी म्हणून हिणवणाऱ्यांना ते आता ‘आम्हीही भारतीय आहोत,’ असे अभिमानाने सांगू  शकणार आहेत. यापूर्वी १२० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.

 

सिंधी समाजातील ही कुटुंबे पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात स्थायिक झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. ७४ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त भारताचा भाग झाल्याबद्दल त्यांनी देशाचे आणि पुणेकरांचे आभार मानले.

देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रांतातून अनेक लोंढे भारताकडे आले. यातीलच काही जण पिंपरी-चिंचवड शहरात आले. पिंपरीमध्ये त्यांनी तळ ठोकला. येथेच त्यांची वसाहत झाली. त्याला पिंपरी कॅम्प असे नाव पडले आणि पुढे हीच ओळख निर्माण झाली. ते येथे वर्षानुवर्षे राहात असले, तरी सिंध प्रांत पाकिस्तानात असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या व्हिसावर ते राहात आहेत. त्यांना आपली ओळख ‘भारतीय’ अशी हवी होती. त्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा दाखला मिळण्यासाठी तब्बल २५-२६ वर्षे त्यांचा संघर्ष सुरू होता.

या बाबतचा अनुभव सांगताना ६० वर्षांचे निरंजन भोगिया  म्हणतात, ‘‘भारतात राहण्यासाठी तीन महिन्यांचा व्हिसा दिला जातो. तो ज्या जिल्ह्यात रहिवासासाठी जातो, त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना द्यावा लागतो. तीन महिन्यांनंतर संबंधित व्यक्तीला व्हिसाची मुदत वाढवून मिळण्यासाठी पुन्हा संबंधित पोलीस आयुक्तालयात कागदपत्रे सादर करावी लागतात. पुन्हा पुन्हा अर्ज करायचा, सोबत कुटुंबाची छायाचित्रे जोडायची. फोटो द्यावे लागतात. यानंतर कागदपत्रांचा हा सारा गठ्ठा पोलीस विभाग, व्हिसा विभागाकडून फिरत राहतो. आता हा त्रास होणार नाही.’’

अंजली आसवानी म्हणाल्या, ‘‘भारतीय असूनही पाकिस्तानी असल्याचा ठप्पा लागला होता. १९४७ नंतर पाकिस्तानातील बहुतांश हिंदू भारतात आले. त्यांना आता भारतीय नागरिकत्व मिळण्यास सुरुवात झाली आहे. सिंधी समाज राष्ट्रीय भावनेने जोडला जात आहे. नागरिकत्व मिळाल्यावर स्वत:ची जागा, घर खरेदी करू शकत आहेत. आम्ही इथे गेली १२ वर्षे राहात आहोत. भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी एफआरओ कार्यालयाच्या शेकडो फेऱ्या माराव्या लागल्या. स्वतःचे घर विकत घेता येईना. नोकरी मिळणे दुरापास्त झाले. दरवेळेस घाबरून लोक घर बदलायला भाग पाडत होते. आता सगळ्या समस्या दूर होतील. ’’

 पूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील रहिवासी आणि आता भारतीय नागरिक असलेले एकता मंचचे अध्यक्ष महेंद्र पंजवानी म्हणाले, ‘‘पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून बारा वर्षांपूर्वी कुटुंबीयांसह भारतात आलो. येथे आम्हाला सुरक्षित वाटते. क्‍लिष्ट प्रक्रियेमुळे नागरिकत्व मिळण्यास विलंब होत होता. १० वर्षांपूर्वी नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे.’’

‘‘गेल्‍या २० वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहोत. तरीही नागरिकत्व मिळाले नव्हते. त्यामुळे मनात आपण परकीय आहोत अशी भावना होती. अनेकांच्या प्रयत्‍नाने आता नागरिकत्व मिळाल्यामुळे प्रजासत्ताकदिन जोरात साजरा करणार आहोत,’’ असे इंदनदास परचानी यांनी सांगितले.

या संदर्भात ‘‘भारतीय नागरिकत्व हवे असलेल्या पाकिस्तानी व्यक्तीला पाच वर्षांपासून भारतात निवास करणे आवश्यक असते. शिवाय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवायचा नसतो. आम्ही अशा नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेतो,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story