अजित पवार, ४० आमदार, २ खासदार, झाले 'देवेंद्रवासी'!

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड करीत रविवारी पाच वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडानंतर खुद्द अजित पवार, ४० आमदार, २ खासदार आता देवेंद्रवासी झाले आहेत. या नाट्यमय परंतु धक्कादायक राजकीय घडामोडीनंतर शहरातील पक्षाच्या दोन आमदारांसह स्थानिक नेते नॉट रिचेबल झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 3 Jul 2023
  • 09:04 am
अजित पवार, ४० आमदार,  २ खासदार, झाले  'देवेंद्रवासी'!

अजित पवार, ४० आमदार, २ खासदार, झाले 'देवेंद्रवासी'!

शहरातील अनेक नेते नॉट रिचेबल, उर्वरित नेते संभ्रमात

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड करीत रविवारी पाच वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडानंतर खुद्द अजित पवार, ४० आमदार, २ खासदार आता देवेंद्रवासी झाले आहेत. या नाट्यमय परंतु धक्कादायक राजकीय घडामोडीनंतर शहरातील पक्षाच्या दोन आमदारांसह स्थानिक नेते नॉट रिचेबल  झाले आहेत. केवळ खासदार वंदना चव्हाण यांनी मी शरद पवार यांच्यासोबत असल्याची आपली भूमिका जाहीर केली आहे.   

अजित पवार यांनी रविवारी पक्षावर दावा सांगत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून मानले गेलेल्या छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यासह हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी राज्यात झालेल्या बंडाच्या ढगफुटीने महाराष्ट्राला मोठा हादरा दिला. अजित पवार यांच्यासमवेत पक्षाच्या ५४ पैकी ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. या राजकीय भूकंपाचे पडसाद शहर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांनी फोन न उचलणेच पसंत केले. प्रवक्ते अंकुश काकडे संपर्क क्षेत्राबाहेर होते. ते संपर्क क्षेत्राबाहेर असले तरी ते शरद पवार यांच्यासमेवत असल्याचे राष्ट्रवादीतील एका नेत्याने सांगितले. माजी महापौर प्रशांत जगताप यांचा मोबाईल स्वीचऑफ लागत होता.

खासदार वंदना चव्हाण यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या समवेत असल्याचे जाहीर केले. थेट शपथविधी होणे धक्कादायक आहे. हा प्रकार ठरवून केल्यासारखा वाटतो. शरद पवार यांना प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे या स्थितीतून ते नक्कीच मार्ग काढतील, असे चव्हाण म्हणाल्या.  

या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्यात त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारी असल्याचे सांगितले होते. राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्याचाही त्यांनी उल्लेख केला होता. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील काही सदस्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे त्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, असत्य ठरतात. पंतप्रधानांनी आरोपातून सगळ्यांना मुक्त केल्याने मी त्यांचे आभार मानतो, अशी खोचक टीकाही पवार यांनी यावेळी केली.  

मी ६ जुलैला महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित होणार होते. त्यात संघटनात्मक बदल करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याचा विचार करणार होतो, पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ज्यांची नावे समोर आली आहेत त्यातल्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला निमंत्रित करून सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनीच जनतेसमोर भूमिका जाहीर केल्यास मी त्यांचा दावा मान्य करेन, अन्यथा त्यांनीही वेगळी भूमिका घेतली असेच मी समजेन, असे पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा १३ सेकंदाचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण, या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चं नाव घेतलं आहे. हा व्हीडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी ‘प्रेरणास्थान’ (Inspiration) असं एका शब्दात आपली भावना मांडली आहे. सुप्रिया सुळेंचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

शरद पवारांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण, असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केला होता. त्यावर हात उंचावून शरद पवारांनी 'शरद पवार' असं उत्तर दिलं. त्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

दरम्यान राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पवारांबरोबर कराडला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story