दस साल बाद, केली जिंदगी बरबाद!

व्यसनी असल्याच्या कारणाखाली दहा वर्षांपूर्वी लग्नात अडथळा आणल्याचा राग मनात धरून एकाने संबंधित महिला आणि तिच्या मुलीवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रदीपसिंग नारिया (वय ३०, रा. कोंढवा) याला रविवारी रात्री अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 17 Jul 2023
  • 11:24 pm
दस साल बाद, केली जिंदगी बरबाद!

दस साल बाद, केली जिंदगी बरबाद!

लग्नात अडथळा आणल्याने दहा वर्षांनंतर संबंधित महिला आणि तिच्या मुलीवर केला कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, आरोपीस तीन दिवसांची कोठडी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

व्यसनी असल्याच्या कारणाखाली दहा वर्षांपूर्वी लग्नात अडथळा आणल्याचा राग मनात धरून एकाने संबंधित महिला आणि तिच्या मुलीवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रदीपसिंग नारिया (वय ३०, रा. कोंढवा) याला रविवारी रात्री अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. गंभीर जखमी महिलेचे नाव रेशमा सुरेनबाबू वाल्मिकी (वय ३५) आणि तिची मुलगी ऋतुजा (वय १८) असे आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे यांनी ‘सीविक मिरर’ ला दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रदीपसिंग हा फिर्यादी रेशमाचा नातेवाईक आहे. दहा वर्षापूर्वी त्याला रेशमाच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करायचे होते. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे फिर्यादीने लग्नास विरोध केला होता. नंतर त्या मुलीचे लग्नही झाले. या घटनेला आता दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. 

मात्र लग्नात अडथळा आणल्याचा राग डोक्यात ठेऊन आरोपी सूडाच्या भावनेने पेटला होता. "तुमच्यामुळे माझे लग्न झाले नाही. त्यामुळे माझे आयुष्य खराब झाले, याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या सगळ्या कुटुंबाला संपवणार" अशी धमकी आरोपीने फिर्यादीस त्यावेळी दिली होती. तो बदला घेण्याची संधी शोधत होता. या घटनेला बराचसा काळ लोटला असल्याने ही धमकी फिर्यादी आणि संबंधित नातेवाईक विसरून गेले होते. त्याचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी बेसावध असताना हल्ला केला. कात्रज परिसरातील संतोष नगर येथील गंगनगिरी शाळेजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. हल्ल्याची घटना शनिवार, १५ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजता घडली. आरोपी फिर्यादींच्या घरी गेला. त्यावेळी फिर्यादीचे पती आणि मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात फिर्यादी रेशमा आणि मुलगी ऋतुजा या दोघीच होत्या. यावेळी आरोपीने दोघींवर कुऱ्हाडीने डोक्यावर, हातावर, पायावर, पाठीवर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या दोघी गंभीर जखमी असून त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी प्रदीपसिंग नारिया (वय ३०, रा. कोंढवा) याला रविवारी रात्री अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून, पुढील तपास सुरु असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी बोलताना सांगितले. जखमी फिर्यादी रेशमा यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story