Yerwada Jail : पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचे बेडीसहित पलायन

न्यायालयातून येरवडा जेलमध्ये जात असताना मोक्का गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसहित पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आरोपीने पलायन केल्यावर पोलीसही सिनेस्टाईलमध्ये त्याच्या मागे पकडायला धावत होते. मात्र, आरोपी दुचाकीवरून पळून गेला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 4 Aug 2023
  • 12:34 pm
पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचे बेडीसहित पलायन

पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचे बेडीसहित पलायन

पाण्याच्या बहाण्याने रिक्षातून खाली उतरलेला आरोपी स्कूटीवरून पसार, पाठलाग करूनही मिळाला नाही ठावठिकाणा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

न्यायालयातून येरवडा जेलमध्ये जात असताना मोक्का गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेडीसहित पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. आरोपीने पलायन केल्यावर पोलीसही सिनेस्टाईलमध्ये त्याच्या मागे पकडायला धावत होते. मात्र, आरोपी दुचाकीवरून पळून गेला. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यातून आरोपी पळून गेला आहे ते पोलीस नाईक राजूदास रामजी चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राजेश रावसाहेब कांबळे असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राजूदास रामजी चव्हाण हे न्यायालयात मागील एक वर्षापासून नेमणुकीस आहेत. त्यांनी बुधवार, २ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांची हजेरी झाली. त्यानंतर पोलीस हवालदार मुरलीधर महादू कोकणे, नाईक नीलेश विनायक गुरव यांच्या सोबत फिर्यादींना शिवाजीनगर न्यायालयात आरोपीला हजर करण्यास सांगितले. आरोपीला मध्यवर्ती कारागृह येरवडा येथून ताब्यात घेण्यासाठी सकाळी ११ वाजता हे तिघे शासकीय वाहनातून येरवडा कारागृहात पोहचले.

हवालदार मुरलीधर कोकणे यांनी वॉरंट घेतले. त्यावेळी तीन आरोपींना न्यायालयात हजर करायचे होते. त्यात आरोपी राजेश रावसाहेब कांबळे (रा. गोसावीवस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर) संतोश नेमुराम सप्रे आणि मुनावर साबिर खान यांचा समावेश होता. यातील राजेश कांबळेला स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या पेशीसाठी सादर करायचे होते. त्यानुसार दुपारी पाऊणच्या दरम्यान तिन्ही आरोपींना घेऊन पोलीस शासकीय वाहनातून शिवाजीनगर न्यायालयात पोहचले. न्यायालयात तिन्ही आरोपींना सादर केले. त्यावेळी न्यायालयाने कांबळे यास पुढील तारीख दिली. बाकी दोन आरोपी संतोश नेमुराम सप्रे आणि  मुनावर साबिर खान यांची कोर्टात सुनावणी चालू होती. त्यामुळे दोन आरोपींना येरवडा कारागृहात ठेवण्यासाठी वेळ लागणार होता. कौटुंबिक कारणामुळे फिर्यादी राजूदास चव्हाण यांना लवकर घरी जायचे होते. त्यामुळे त्यांनी तसे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. राजेश कांबळेला खासगी वाहनाने येरवडा जेलमध्ये नेतो असे सांगितले. तुम्ही दोघे बाकीच्या दोन्ही आरोपींना सादर केल्यावर येरवडा कारागृहात घेऊन जा, अशी विनंती फिर्यादीने इतर कर्मचाऱ्यांना केली. त्यांचा होकार मिळताच दुपारी पावणे तीन वाजता फिर्यादी कांबळेला  शिवाजीनगर न्यायालयाच्या चार नंबर गेटमधून बाहेर घेऊन गेले. तेथे एका रिक्षातून आरोपीसह शिवाजी पुतळा चौकाकडे जात असताना अलोक हॉटेल समोरील चौकात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असल्यामुळे रिक्षा चालकाने रिक्षा गावठाणात जाणाऱ्या रस्त्याने घेतली. वाटेत कांबळे फिर्यादींना म्हणाला की मला तहान लागली आहे. पाणी पिण्यासाठी थोडा वेळ थांबा. यावर रिंजट हॉटेलच्या बाजूस असलेल्या दुकानाजवळ रिक्षा थांबवली आणि तो पाणी पिण्यासाठी खाली उतरला.

दरम्यान स्कूटीवर एक अनोळखी वेगाने आला आणि त्याने  कांबळे जवळ गाडी थांबवली. त्यावर बसून आरोपीने गाडी बांबू हाऊस समोरील रस्त्याने जे एम रस्त्याकडे दामटली. ते दोघे पोलिसांच्या डोळ्यासमोरून पसार झाले. आरोपी स्कूटीवरून पळून जात असताना मागे फिर्यादींनी धाव घेतली. भररस्त्यावर आरोपी पुढे गाडीवरून पळून जात होता तर पोलीस त्याच्या मागे धावत होते. कांबळे बसलेली गाडी जे एम रस्त्यावरून डावीकडे वळून बालगंधर्व चौकाच्या दिशेने निघून गेली. पोलिसांनी बालगंधर्व चौकापर्यंत त्याचा पाठलाग केला. परंतु पुढे तो पसार झाला होता. नक्की कुठे गेला हे पोलिसाला समजले नाही.

त्यानंतर फिर्यादी यांनी फोनवरून सहकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी मिळून आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपी सापडला नाही. फिर्यादीने घडलेल्या घटनेची माहिती पुणे शहर नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पळून गेलेला आरोपी आणि त्याला मदत करणारा स्कूटी चालक यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story