भाड्याची इनोव्हा क्रिस्टा घेऊन झाला फरार
नितीन गांगर्डे
इनोव्हा क्रिस्टा गाडी भाडेतत्त्वावर घेऊन फरार झालेल्या नागपूरमधील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. रोहीत संदीप दरेकर हा यातील मुख्य आरोपी असून त्याला साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. माय कार अॅपवरील मोबाईल नंबरवरून दरेकर याने टूरिस्ट व्यावसायिक नीलेश रोहिदास निंबाळकर यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्याकडून इनोव्हा क्रिस्टा ९ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आणि पसार झाला होता. या प्रकरणी निंबाळकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
निंबाळकर यांनी १२ मे २०२३ रोजी दरेकर यास ९ दिवसांसाठी क्रिस्टा भाडेतत्त्वावर दिली होती. गाडी घेताना दरेकर याने सावत्र भावाची कागदपत्रे सादर केली होती. त्याने भावाची इको ही चारचाकी चाकण येथून चोरी केली होती. गाडीत असलेले आधारकार्ड, पॅनकार्ड, चेकबुक त्याने काढून घेतले होते. त्याचा त्याने येथे वापर केला. भाडेतत्त्वावर घेतलेली गाडी मुदत संपल्यावरही परत केली नाही. त्यामुळे निंबाळकर यांनी संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही. संशय आल्याने निंबाळकर यांनी दरेकरच्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा कागदपत्रे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
विमानतळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी आरोपीच्या मोबाईल नंबरचा सीडीआर मिळवला. तांत्रिक विश्लेषण करून दरेकर याला शिरूर येथून ताब्यात घेतले. मात्र त्याच्याकडे गाडी मिळाली नाही. आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी केली असता साथीदारांची त्याने नावे सांगितली. त्यामध्ये आकाश पोटघन, गणेश माळी, सौरभ हावळे यांचा उल्लेख असून त्यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार आरोपींना शिक्रापूर आणि नाशिक परिसरातून अटक केली.
या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गाडी विकण्यासाठी मृणाल सोरदे, राकेश पवार यांच्याकडे (नागपूर ) दिल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोडे यांच्या पथकाने नागपूर येथे जाऊन आरोपी मृणाल प्रकाश सोरदे, राकेश देवेंद्र पवार यांना क्रिस्टासह ताब्यात घेतले.
रोहीत संदीप दरेकर आणि आकाश रावासाहेब पोटघन हे सराईत गुन्हेगार आहेत. दरेकर याच्यावर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. आरोपी आकाश रावासाहेब पोटधन याच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो फरार होता.