आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर?

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून उमेदवारी जाहीर केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 03:01 pm
आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर?

आघाडीतील बिघाडी भाजपच्या पथ्यावर?

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत जगतापांना आव्हान देणारे आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही मैदानात उडी घेत उमेदवारी दाखल केली आहे. कलाटे पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवल्यास आघाडीत झालेली बिघाडी भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. 

भाजपकडून आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी उमेदवार न देता युतीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दर्शविला होता. २०१४ मध्ये आलेली मोदी लाट २०१९ पर्यंत कायम होती. त्यामुळे जगताप यांच्या विरोधात कोणताच पक्ष उमेदवार देण्यास त्या वेळी तयार नव्हता. 

गेल्या वेळी राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून सर्वांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत एक लाख १२ हजार एवढी मते घेतली होती. लक्ष्मण जगताप हे मोदींच्या लाटेत ३८ हजारांनी विजयी झाले होते. त्यामुळे आमदार जगताप यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे हेच प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयात उमेदवार नको म्हणत राहुल कलाटे यांना स्पष्ट विरोध दर्शविला गेला. पक्षातून पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवार तीव्र इच्छुक असून, यापैकी कोणाही एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी चिंचवड विधानसभा पक्ष निरीक्षक आमदार सुनील शेळके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समोर मांडली होती.

अजित पवार यांनी सोमवारी शहरात येऊन सर्व इच्छुक उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी उमेदवार जाहीर करून मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणार असल्याचे सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत आघाडीचा उमेदवार म्हणून कलाटे यांचे नाव असताना रातोरात गणिते फिरली आणि नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाली. एकंदरीत या सर्व बाबी पाहता राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरी आता भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे.

राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि आमदार सुनील शेळके यांनी कलाटे यांच्या घरी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण कलाटे यांनी समर्थक माजी नगरसेवक अमित गावडे, नवनाथ जगताप, मीनल यादव, अश्विनी वाघमारे यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काटे यांनी अर्ज दाखल केला. या वेळी कलाटे आणि काटे हे आमनेसामने आले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story