कुत्र्याच्या मृत्यूबद्दल विचारणा करणाऱ्या महिलेचा कारचालकाने केला विनयभंग

भरधाव जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लाला जोरदार धडक देऊन उडवले. यात त्याचा मृत्यू झाल्याने याचा कारचालकाला जाब विचारणार्‍या महिलेला उलट कारचालकानेच शिवीगाळ केली. तसेच अश्लील हावभाव करीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 1 Aug 2023
  • 12:30 am
कुत्र्याच्या मृत्यूबद्दल विचारणा करणाऱ्या महिलेचा कारचालकाने केला विनयभंग

कुत्र्याच्या मृत्यूबद्दल विचारणा करणाऱ्या महिलेचा कारचालकाने केला विनयभंग

कोरेगाव पार्कमध्ये भरधाव कारने उडवल्याने कुत्र्याचा मृत्यू, कारचालकाचे उद्दाम वर्तन

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

भरधाव जाणाऱ्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लाला जोरदार धडक देऊन उडवले. यात त्याचा मृत्यू झाल्याने याचा कारचालकाला जाब  विचारणार्‍या महिलेला उलट कारचालकानेच शिवीगाळ केली. तसेच अश्लील हावभाव करीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्त्यावरील जॉकी बारसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान एक ओला उबेर कंपनीची कार आली होती. एका महिलेला येथे सोडून कारचालक माघारी चालला होता. त्यावेळी भरधाव कार चालवून त्याने रस्त्यावरील कुत्र्याच्या अंगावर कार घातली. यात कुत्रा चेंगरलेला पाहूनही तो पुढे जाऊ लागला. त्यावेळी एका महिलेने कारचालकाला थांबवले. याविषयी जाब विचारला असता कुत्रा तर आहे, त्यात काय अशी प्रतिक्रिया त्याने दिली. उलट महिलेलाच घाणेरडे हावभाव करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

यावर महिलेने कारवर असलेल्या मोबाईल नंबरवरून गाडीमालकाशी  संपर्क केला. चालकाचे नाव विचारले आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बाळू माणिक गायकवाड (वय २७, रा. धावडे वस्ती, भोसरी एमआयडीसी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक नीलिमा पवार म्हणाल्या की, कुत्र्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

भारतीय दंडसंहितेनुसार कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करणे हा शिक्षापात्र गुन्हा असून त्यात तुरुंगवासाची तरतूदही आहे. प्राण्यांनाही जगण्यासाठी माणसाएवढेच हक्क कायद्यानेच बहाल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड येथे काही दिवसांपूवी कुत्र्याच्या अंगावर कार घालून त्याची हत्या केली होती. तेथेच पूजेच्या नावाखाली डुकरांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. पुणे शहरात एका भटक्या बैलावर धारदार कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. याबाबतचे वृत्त सीविक मिररने वेळोवेळी दिले होते.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story