बंदोबस्ताची खास बडदास्त
अंकित शुक्ला/राहुल देशमुख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पोलिसांचा मोठा फौजफाटा पुण्यात दाखल झाला आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांसह सुमारे २३ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील सुमारे साडे पाच हजार पोलिसांच्या बरोबरीने हा अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार आहे.
कोथरूड येथे नुकतेच दोन संशयित दहशतवादी पकडले गेले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांची धरपकड शहर आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व अधिकारी यावेळी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच नागरिकांना व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा फटका बसू नये यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
देशातील सुरक्षा विभागांशी संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी एक आठवड्यापासून पुणे शहरात ठाण मांडून आहेत. पोलिसांच्या नांदेड आणि नागपूर परिक्षेत्राव्यतिरिक्त अन्य सर्व विभागांमधून पोलीस अधिकारी पुण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून दोन सहायक पोलीस आयुक्त, ११ वरिष्ठ निरीक्षक, ५० सहायक निरीक्षक/फौजदार, ५०० कर्मचारी पुण्यात बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस दलातून एक अतिरिक्त अधीक्षक, दोन उप-अधीक्षक, पाच निरीक्षक आणि १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी शहरात असणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सर परशुरामभाऊ कॉलेज (एसपी कॉलेज) परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफा ज्या रस्त्याने जाईल तेथे सर्वत्र बांबूचे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार असल्याचे यापूर्वी पोलिसांनी कळवले आहे.
'सीविक मिरर' शी बोलताना पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) .ए. राजा म्हणाले की, शहरात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीआयपी बंदोबस्तामुळे रस्ते बंद असताना नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन राजा यांनी केले.