लहान दुभाजक, रिफ्लेक्टरविना, अपघातांची मालिका...

घोले रस्त्यावर महात्मा फुले संग्रहालयाच्या समोर पालिकेकडून दुभाजक तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याचा आकार खूपच लहान आहे. त्यामुळे वाहने त्यावर धडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Thu, 15 Jun 2023
  • 11:51 pm
लहान दुभाजक, िरफ्लेक्टरविना, अपघातांची मालिका...

लहान दुभाजक, रिफ्लेक्टरविना, अपघातांची मालिका...

घोले रस्त्यावर महात्मा फुले संग्रहालयाच्या समोरील लहान दुभाजकामुळे वारंवार अपघात; पालिकेचे मात्र दुर्लक्षच

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

घोले रस्त्यावर महात्मा फुले संग्रहालयाच्या समोर पालिकेकडून दुभाजक तयार करण्यात आले आहे.  मात्र, त्याचा आकार खूपच लहान आहे. त्यामुळे वाहने त्यावर धडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास येथील दुभाजकावर एक चार चाकी गाडी अडकली होती. चालकाचे लक्ष दुभाजकाकडे न गेल्याने हा अपघात झाला होता. ते चढत्या क्रमाने असल्याने लक्षात येत नाही. रस्त्यावरील पडलेला छोटासा दगड समजून वाहनचालक त्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे अपघात होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.  महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बुधवारी रात्री येथून जात असलेली चारचाकी कार (क्र. एम. एच. १२ एम. झेड. ८०५५) हिचा अपघात झाला होता. रात्री अंधारात चालकाला दुभाजक न नसल्याने त्यावर गाडी गेली आणि ती नंतर तेथेच अडकली. त्यामुळे गाडीचेही नुकसान झाले, तसेच अपघातामुळे काही प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली होती. अखेर अनेक लोकांनी एकत्र जमून दुभाजकावरून गाडी उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गाडी बाहेर निघाली. 

घोले रस्त्यावर वाहने वेगाने जात असतात. येथील रस्त्यासाठी अपरिचित असलेल्या चालकाला अचानक समोर दुभाजक आल्याने त्याचा गोंधळ होतो. त्यामुळे साहजिकच अचानकपणे ब्रेक दाबला जातो. त्या वेळी मागून वेगाने येणारी वाहने अचानक पुढे थांबलेल्या वाहनावर धडकण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वेगाने येणारे वाहनचालकाने ब्रेक दाबला नाही, तर ते वाहन थेट दुभाजकाला जाऊन अडकते किंवा धडक देऊन मागे येते.  त्यामुळे येथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी छोटे गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे. लहान गतिरोधक बसवून वाहनांचा वेग कमी होईल. 

घोले रस्त्यावरील दुभाजक अत्यंत लहान तर आहेच, परंतु ते चढत्या क्रमाने आहे. सुरवातीचा त्याचा भाग पाहिल्यास छोटा दगड असल्याचा भास होतो. त्यामुळे वाहनचालक त्यावर वाहन नेतात. वाहनचालकांना ते पटकन दिसावेत यासाठी प्रशासनाने येथे कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली नाही. त्याठिकाणी पांढरे पट्टे आणि झेब्रा क्रॉसिंग करण्याची आवश्यकता असून, दुभाजकाचा आकारही मोठा करावा, तसेच ते लांबून ओळखू येण्यासाठी त्यावर 'रिफ्लेक्टर' बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रिफ्लेक्टर, स्पीड लिमिट बोर्ड, झेब्रा क्रॉसिंग आणि वेगमर्यादा अशी योग्य व्यवस्था नसलेली विविध ठिकाणे शहराच्या विविध रस्त्यांवरील अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. 

याबाबतीत पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले की, घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयाच्या समोरील दुभाजकावरील अपघात टाळण्यासाठी तातडीने  योग्य त्या उपाययोजना केला जातील. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story