Reckless criminal threatens : बेफाम गुन्हेगाराची पोिलसांनाच गोळ्या घालण्याची धमकी

जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराने सोडा बॉटल, सळईने हॉटेल मालकासहित कर्मचाऱ्यांना मारहाण करत राडा घातला. त्याला आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही सळईने मारहाण करत शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीने पोलीस ठाण्यातही पोलिसांना मारहाण करत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 25 Jul 2023
  • 02:32 am
बेफाम गुन्हेगाराची पोिलसांनाच गोळ्या घालण्याची धमकी

बेफाम गुन्हेगाराची पोिलसांनाच गोळ्या घालण्याची धमकी

जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराने आधी हॉटेलमालक, ग्राहक नंतर पोलिसांवरच केला हल्ला; हॉटेलमध्ये धुमाकूळ, सोडा बॉटल, सळईने मारहाण

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराने सोडा बॉटल, सळईने हॉटेल मालकासहित कर्मचाऱ्यांना मारहाण करत राडा घातला. त्याला आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही सळईने मारहाण करत शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली. आरोपीने पोलीस ठाण्यातही पोलिसांना मारहाण करत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांवर हल्ला आणि मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे शहरातील पोलीसच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर दरारा राहिला नसल्याने नागरिक कसे सुरक्षित राहणार, असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे. या प्रकरणी हॉटेल मालक सुरेश रामचंद्र देसाई यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी वैभव इक्कर, चैतन्य चोरघे यांना अटक केली आहे.  

फिर्यादी देसाई हे तीन वर्षांपासून भागीदारासह इंद्रप्रस्थ नावाचे हॉटेल व लॉज चालवतात. वैभव इक्कर (रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) हा गुन्हेगार असून तो काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला आहे. त्याच्यावर मर्डर, हाफ मर्डर, पोलिसांना त्रास देणे असे गुन्हे आहेत. तो मित्रांसमवेत वारंवार फिर्यादीच्या हॉटेलवर जात असे. तेथे फिर्यादींना, मी एम. के. गॅंगचा शुटर आहे, या इलाक्यात आमचेच चालते. मला महिन्याला हप्ता द्या, नाहीतर मी भाईला सांगून तुमची वाट लावतो, अशी धमकी देत असे. फिर्यादी घाबरून त्याला पैसे देत होते.

रविवार, २३ जुलै रोजी रात्री आठला वैभव इक्कर मित्र चैतन्य चोरघे समवेत आला होता. त्यावेळी टॉयलेटमध्ये गेलेल्या ग्राहकांना लवकर बाहेर ये असे तो ओरडत होता. "ये लवकर बाहेर ये मला जायचे आहे, नाहीतर तुला मारून टाकीन" अशी धमकी देत होता. ग्राहकास बाहेर यायला थोडा वेळ लागल्याने आरोपीने बाहेर आल्यावर ग्राहकाला मारहाण केली. फिर्यादी मध्यस्थी करत असताना त्यांनाही मारहाण केली. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या वेटरच्या डोक्यावर सोडा वॉटरच्या बॉटल मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वेटरच्या डोक्यास जखम झाल्याने तो तेथेच खाली पडला. त्यानंतर वैभव इक्कर आणि चोरघे यांनी हॉटेलमधील फ्रिज, दरवाजाच्या काचा फोडल्या. तोडफोड झाल्यावर आरोपी काउंटरमधील पैसे घेत होते. फिर्यादी आणि हॉटेलचा स्टाफ अडवत असताना आरोपी हॉटेल बाहेरील सळई घेऊन आला. आणि सगळ्यांना मारहाण केली.  त्यावेळी चैतन्य चोरघे आणि वैभव इक्करने हॉटेलच्या काउंटरमधील साधारण २० ते २५ हजाराची रक्कम काढून घेतली. नंतर त्यांनी हॉटेलचे शटर बंद केले. हॉटेलमधील सगळ्यांना  "एम. के. आमचा बॉस आहे. आम्हाला कोणी नडला, तर त्याला तोडला" अशी धमकी दिली. हा गोंधळ थांबण्याचे नावच घेत नसल्याने ११२ क्रमांकाला फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम सहकाऱ्यांसह आले. आरोपीस ताब्यात घेत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. वैभव याने सळईने पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एका पोलिसाच्या डोक्यात सळईचा वार केला असता त्यांनी चपळाईने चुकवला. मात्र तो हातावर झाला. आरोपीने कोण पोलीस आम्ही नाही ओळखत.  तुम्हाला गोळ्या घालतो" अशी धमकी दिली. या गोंधळामुळे हॉटेलमधील ग्राहक घाबरून जिवाच्या भीतीने तेथून निघून गेले. पोलिसांनी दोघांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणले असता आरोपींनी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यास शिव्या देऊन तुम्हाला मारून टाकतो " अशी धमकी दिली. तसेच त्यांना लाथ मारण्याचा प्रयत्न केला. वैभव इक्कर (रा. कोल्हेवाडी ता. हवेली), चैतन्य चोरघे या दोघांना अटक केली असून पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story