आईच्या फोनमधून गुपचूप पाठवले सव्वा लाख

इंस्टाग्रामवर खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीने भीतीपोटी आईच्या फोनमधून गुपचूप १ लाख २१ हजार रुपये त्याला पाठवले. पीडितेच्या आईला हा प्रकार समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 23 Jul 2023
  • 11:14 pm
आईच्या फोनमधून गुपचूप पाठवले सव्वा लाख

आईच्या फोनमधून गुपचूप पाठवले सव्वा लाख

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

इंस्टाग्रामवर खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित  मुलीने भीतीपोटी आईच्या फोनमधून गुपचूप १ लाख २१ हजार रुपये त्याला पाठवले. पीडितेच्या आईला हा प्रकार समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी लष्कर (कॅम्प) परिसरात राहात असून ती १९ वर्षांची आहे. मुलीची फेसबुकच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या माध्यमातून त्यांचे बोलणे वाढले. तरुणीने हक्काचा जवळचा विश्वासू मित्र समजून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधायला सुरुवात केली.  दोघांची चांगलीच गट्टी जमली. मुलगी विश्वासाने त्याच्याशी बोलत राहिली. याच विश्वासाचा गैरफायदा त्याने उचलला. आरोपीने तरुणीवर जीवापाड प्रेम करत आल्याचे नाटक करत तिचा विश्वास संपादन केला. तरुणीला स्वतःकडे आकर्षित करून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात खेचले.

त्यानंतर या दोघांचा मोबाईल नंबर एकमेकांकडे आला. आरोपी आता चॅटिंगसोबत तरुणीला व्हॉट्स ॲप कॉल करू लागला. व्हीडीओ कॉलवर झालेल्या संभाषणादरम्यान आरोपीने तरुणीच्या खासगी क्षणातील फोटो काढले. पुढे तेच फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे पैशांची मागणी केली. तरुणीने देखील आपली बदनामी होईल या भीतीपोटी वेळो-वेळी त्याला पैसे पाठवले. तिने आईचा फोन घेऊन त्यातील 'फोन पे', 'गूगल पे' वरून आरोपीला पैसे पाठवले. पैसे पाठवल्यावर तरुणी आईला समजू नये म्हणून व्यवहारांची हिस्ट्री डिलिट करत होती. त्यामुळे एक वर्षभर हा प्रकार तरुणीच्या घरातील कोणाच्याच लक्षात आला नाही. एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत हा प्रकार सुरू होता. एवढ्या कालावधीत तरुणीने आईच्या बँक खात्यातून एकूण १ लाख २१ हजार रुपये आरोपीच्या हवाली केले होते.

दरम्यान पीडितेच्या आईला मोबाईलवरून १५ हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या व्यक्तीला गेल्याचे नोटिफिकेशन आले. त्यावेळी त्यांनी संबंधित नंबरवर फोन करून ते पैसे परत मागितले. आरोपीने त्यांना पंधरा हजार रुपये परत केले. त्याच वेळी आपल्या बँक खात्यातून अनेक वेळा याच नंबरवर पैसे पाठवल्याचेही  त्यांच्या लक्षात आले. आईने तरुणीला विचारपूस केली असता, पीडितेने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. 

या प्रकरणी पीडितेच्या आईने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी इंस्टाग्राम खातेधारकाच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि  विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story