Koregaon Park Death threats : चारचाकीला कागद डकवून १० लाखांची मागणी

शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका व्यावसायिकाला कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत व्यावसायिक करण सुनील इंगुले यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 4 Aug 2023
  • 12:21 pm
चारचाकीला कागद डकवून १० लाखांची मागणी

चारचाकीला कागद डकवून १० लाखांची मागणी

कुटुंबीयांसमवेत जिवे मारण्याची धमकी देत कोरेगाव पार्क परिसरात व्यावसाियकाला मागितली खंडणी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका व्यावसायिकाला कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी देत १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत व्यावसायिक करण सुनील इंगुले यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

"हमे बस १० लाख रुपये की जरूरत है. हमें पैसा दो. ये बात पुलिस को बता दिया तो तुम्हारे परिवार के एक एक आदमी से सबको मौत के घाट उतार देंगे. हम पचास लोग है. अगर तुमको भरोसा नही तो हम परसों से आपके मौत का इंतजार करेंगे. तुम्हारे एक गलती की सजा मौत है". अशा धमकीचे पत्र एका व्यावसायिकाच्या कारवर चिकटवल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नं ७ येथे १ ऑगस्ट रोजी रात्री १२:१० मिनिटांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर फोन करून सगळ्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत व्यावसायिक करण सुनील इंगुले यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

करण सुनील इंगुले ( वय ३७, रा. मगरपट्टा सीटी, हडपसर. मूळ गाव खाटीक गल्ली, बारामती). फिर्यादी मागील तीन वर्षांपासून हडपसर परिसरात राहात आहेत. २०१६ पासून ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांचे बारामती येथे एक हॉटेल, होम अप्लायन्स आणि लेदर बॅगचे दुकान आहे. तेथील व्यवहार त्यांचा भाऊ पाहतो. फिर्यादीचे वडील महसूल विभागातून सर्कल पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

३१ जुलै रोजी रात्री ८:३० च्या सुमारास  फिर्यादी आणि त्यांचा मित्र पंकज एकनाथ निकुडे हे दोघेजण कोरेगाव पार्क येथील लेन नं. ७ येथील 'डेझर्ट वॉटर' या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी फिर्यादींनी त्यांची चारचाकी कार एमएच ४३ एजे ७९७२ येथील लेनच्या बाजूला हॉटेलच्या उजव्या बाजूला उभी केली होती. हॉटेलमध्ये जेवण करून फिर्यादी १ ऑगस्ट रोजी रात्री १२:१० वाजता बाहेर आले. त्यावेळी ते गाडीजवळ गेले असता ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजावर एक पांढऱ्या रंगाचे बंद कागदी पाकीट चिकटवलेले त्यांनी पाहिले. ते बंद पाकीट त्यांनी उघडून बघितले असता  त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कागदावर काळ्या शाईत मजूकर लिहिलेला होता.

त्यात "राम राम साहेब. तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला ओळखतो. तुमच्याकडे माझे छोटेसे काम आहे. आम्हाला १० लाखांची गरज आहे. १० लाख दिले नाहीत तर तुमच्या कुटुंबीयांसह सर्वांना ठार मारू. आमच्या एका माणसाला पकडले तरी आम्ही पन्नासजण आहोत. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला फोन करा. पैसे दिले की तुमचा-आमचा संबंध नाही'  असा हिंदी भाषेतील मजकूर असून फिर्यादींच्या सर्व कुटुंबीयांनाच मारण्याची धमकी दिली होती. त्यावरच निळ्या रंगाच्या शाईने "७३५०५२४०२३" हा मोबाईल नंबर लिहिलेला होता.

फिर्यादींनी हा मजकूर वाचला. त्यावर असलेल्या नंबरवर त्यांचा मित्र पंकज याच्या मोबाईल वरून ३ वेळा फोन केला मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे फोनवर काहीच बोलणे झाले नाही. नंतर फिर्यादी हे त्याच्या घरी गेले. त्याच दिवशी सकाळी १० वाजता फिर्यादी आणि त्यांचा मित्र पंकज हे जेजुरीला गेले होते. दुपारी २:३० च्या दरम्यान त्यांचा मित्र पंकज यांच्या फोनवर फोन आला. तो नंबर रात्री कारला चिकटवलेल्या चिठ्ठीवरीलच होता. फोन घेतल्यावर समोरील व्यक्ती हिंदी भाषेतून संवाद करत होती. "तुझा आणि तुझ्या कुटुंबीयांचा जीव वाचवायचा असेल तर तू कोरेगाव पार्क येथे जेवणाच्या डब्यात १० लाख रुपये घेऊन ये. कोठे आणायचे, कसे आणायचे ते मी सांगतो,  असे बोलून मारून टाकण्याची धमकी दिली.

फिर्यादी रात्री हडपसर येथील घरी आले.  त्यांनी धमकी देणारा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि सकाळी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुधवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले की, भारतीय दंड विधान ३८७, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने ज्या ठिकाणी कार उभी केली होती तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. फिर्यादी यांचे कोणाशी जुने वैर नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही तांत्रिक विश्लेषण करत आहोत. धमकी देणारा कोण याचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल. पोलीस उपनिरीक्षक  नरळे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story